पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपल्याने दिवाळी सणाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी जवळीक साधल्याचे दिसून आले. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून इच्छुकांनी आता उमेदवारीसाठी अशा प्रकारे मोर्चेबांधणी केल्याचे दिसून आले. दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी विविध उपक्रम राबवून सामाजिक भान जपले. महापालिकेच्या निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा सर्वच पक्षांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. तसेच नवीन कार्यकारिणी, वॉर्ड अध्यक्ष, शहराध्यक्षांच्या निवडी सुरू आहेत. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी विविध पक्षांच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत. दिवाळी पहाटचे आयोजन करणे, दुष्काळनिधी जमविणे, दिवाळीत सामाजिक उपक्रम राबविण्यावर राजकीय पक्षांनी भर दिल्याचे दिसून आले. तसेच नेत्यांशी जवळीक साधावी म्हणून अनेकांनी नेत्यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत देऊ केली. दिवाळी पाडव्याला नेत्यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ, स्नेहमेळावा असतो. त्या स्नेहमेळाव्यांना उपस्थित राहून कार्यकर्त्यांनी आपली नेत्यांशी जवळीक आहे, हे दाखवून दिले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामतीतील साहेबांच्या निवासस्थानी, तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मनसेप्रमुखांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी जवळीक साधल्याचे दिसून आले. दिवाळी पहाट मैफलींतून राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न शहरात मोठ्या प्रमाणावर झाला. निगडी, प्राधिकरण, चिंचवड, सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, नेहरुनगर, चिखली, आकुर्डी, सांगवी, भोसरी अशा विविध भागांतील राजकीय नेत्यांनी दिवाळी पहाट मैफलींचे आयोजन केले. (प्रतिनिधी)
दिवाळी औचित्याने नेत्यांशी सलगी
By admin | Published: November 15, 2015 12:59 AM