- नितीश गोवंडे
पुणे : दिवाळी म्हटले की उत्सव, आनंद, नवीन खरेदी, फराळ यांची रेलचेल आलीच. पाडव्याला सुवासिक तेल, सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान, नवे कपडे परिधान करून गोडधोड पदार्थांवर ताव मारण्याचा हा उत्सव. पण अनेक गरीब मुलांच्या नशिबी हे भाग्य नसते. त्यांचीही दिवाळी गाेड हाेण्यासाठी ७९ वर्षीय सुषमा गोडबोले आजी स्व-खर्चाने नवीन कपडे शिवून वाटप करत आहेत.
लहानपणी सुषमा गोडबोले यांच्या आईने त्यांना लहान मुलांचे काम म्हणजे देवाचे काम असते, अशी शिकवण दिली. पुढे त्या गुजरात येथे असताना आपले मन रमवण्यासाठी गरजूंकरिता मोफत कपडे शिवून देण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांचे पती विजय गोडबोले यांनी देखील सहकार्य केले. गेली १३ वर्षे त्या गरीब आणि अनाथ मुलांसाठी नवे कपडे शिवण्याचा उपक्रम राबवत आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी देखील त्यांनी आपल्यातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली आहे.
हुजूरपागेतून शिवणाचे शिक्षण घेतल्यानंतर मुलींचे कपडे शिवण्यापुरतीच माझी कला होती. मात्र, त्याला आता वेगळे परिमाण लाभले याचे समाधान वाटते. मी रद्दी विकून आलेले पैसे, भेट स्वरूपात आलेल्या वस्तू आणि महिन्याला घर खर्चासाठी नवऱ्याने दिलेल्यातले पैसे वाचवून मी त्याचा उपयोग नवीन कपडे मिळवण्यासाठी करते.
दिवाळीपूर्वी नवे कपडे शिवून झाल्यावर ते स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द करते. नंतर मी दोन महिने सुटी घेते. नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी रोजी पुढील वर्षीच्या दिवाळीच्या कामाचा श्रीगणेशा करते. त्यामुळे मला पुरेसा वेळ मिळतो, असेही सुषमा गोडबोले यांनी सांगितले.
मी स्वत: शिवलेले कपडे गरजूंना दिल्यानंतर नवे कपडे परिधान केलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर झळकलेला आनंद हीच माझी दिवाळी आहे.
- सुषमा गोडबोले, अनाथांची आजी