प्रज्वल रामटेके
पुणे : यंदाची दिवाळी साजरी करताना लक्ष्मीपूजनानिमित्त पुणेकरांनी माेठ्या प्रमाणात फटाके फाेडले; ज्यामुळे शहरातील हवेचा दर्जा एकदमच बिघडला आहे. भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) ‘सफर’ या संकेतस्थळाने केलेल्या नाेंदीनुसार, शहरातील हवेचा दर्जा एकदम खराब श्रेणीत पाेहाेचला आहे. त्यामुळे ‘पुणेकरांनाे, दिवाळी जाेरात साजरी करा; पण फटाके बेतानेच फाेडा’, असे पुणेकरांना सांगण्याची वेळ आली आहे.
एकाच दिवसात फरक
हिवाळा सुरू झाला, त्याचवेळी पुण्यातील हवेचा दर्जा ढासळला होता. अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) आणि सूक्ष्म धूलिकणात (पीएम १०) वाढ झाल्याने शहराच्या मुख्य भागातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीपर्यंत पोहोचली होती. तर एकूण पुण्याच्या हवेची गुणवत्ता कधी समाधानकारक तर कधी मध्यम श्रेणीत नोंदली जात होती. रविवारी त्यात फटाक्यांच्या धुराची भर पडली आणि शहरातील सूक्ष्म धूलिकणांमध्ये दुपटीने वाढ झाली. लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी शिवाजीनगर परिसरातील हवेची गुणवत्ता अतिवाईट, तर कोथरूड, पिंपरीमधील भूमकर चौक, निगडी, भोसरीमध्ये हवेचा दर्जा वाईट नोंदविण्यात आला. आकाशामध्ये फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच धुराचे ढगही पाहायला मिळाले. आवाजाच्या फटाक्यांसोबतच नागरिकांनी फॅन्सी, रोषणाइचे फटाके वाजविल्याने वायुप्रदूषण वाढले, असा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
फटाक्यांचेच प्रदूषण
रविवारी पहाटेपासूनच फटाके फोडणे सुरू झाले. दिवसभर ते सुरूच होते. सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर व्यापारी पेठांमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण एकदम वाढले. बराच वेळ फुटणाऱ्या फटाक्यांच्या मोठ्या माळा, त्याचप्रमाणे आकाशात जाऊन मोठा बार करणारे, रंग उडवणारे फटाके फार मोठ्या प्रमाणात वाजवले गेले.
शहराशिवाय उपनगरांमध्येही परिणाम
पुणे शहर आणि परिसरातील काही भागांमध्ये रविवारी हवेच्या गुणवत्तेने धोकादायक पातळी ओलांडल्याचे दिसून आले. त्यात प्रामुख्याने पिंपरी चिंचवड, भोसरी, आळंदी, कात्रज अशा काही भागांमधील हवेची गुणवत्ता बिघडली होती. हवेची गुणवत्ता बिघडल्याने श्वसनास त्रास होणे, दम लागणे अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्रदूषणामुळे त्यात आणखी भर पडते. गेल्या काही दिवसांत मुंबईप्रमाणेच पुण्यातीलही हवेची गुणवत्ता बिघडल्याचे हवा गुणवत्ता निर्देशांकातील आकडेवारीतून दिसून आले होते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
आवाज कमी, मात्र धूर वाढला
गेल्या काही वर्षांत दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाऱ्या आवाजाच्या दुष्परिणामांबद्दल जागृती झाली आहे. परिणामी ध्वनिप्रदूषण कमी होऊन हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याचे चार वर्षांतील निकषांमधून स्पष्ट झाले आहे. तापमान वाढले की, हवा हलकी होऊन उंच जाते, पसरते. त्यामुळे धूलिकणही विखुरतात. परंतु, दरवर्षी दिवाळीमध्ये थंडी असते. तापमान कमी असल्याने हवा जड होऊन ती वातावरणात स्थिर राहते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होतो.
शहरातील वायुप्रदूषण वाढले आहे. त्यामुळे ब्रॉंकायटिस, अस्थमा यांसारख्या श्वसनाचा आजार असणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. एअर प्युरिफायर असल्यास त्याचा वापर करावा. रात्री फटाक्यांच्या आतषबाजीमुळे धूर आणि सकाळचे धुके एकत्र मिक्स मिसळून धुरके तयार होतात. त्यामुळे ४-५ दिवस मॉर्निंग वॉक करू नये. अँटी ऑक्सिडेंट असणाऱ्या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. -डॉ. अपर्णा बिराजदार, श्वसनरोगतज्ज्ञ