लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिवाळीत नातेवाईकांना कुरिअरद्वारे फराळ पाठविल्यानंतर फराळ न मिळाल्याने त्याबाबत चौकशी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुरिअर कंपनीच्या संकेतस्थळावरील मोबाइल क्रमांकावर विचारणा केल्यानंतर, चोरट्याने त्यांच्या खात्यातील दहा हजार रुपये लांबविले.
याप्रकरणी विठ्ठलवाडीतील ७४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिवाळीत त्यांनी मुंबईत राहणाऱ्या नातेवाईकांना कुरिअरद्वारे फराळ पाठविला होता. दिवाळी झाल्यानंतरही नातेवाईकांना घरपोच फराळ न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकाने कुरिअर कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर विचारणा केली. संकेतस्थळात काही फेरफार करून चोरट्याने त्याचा मोबाइल क्रमांक तेथे टाकला होता. त्यांनी चोरट्याचा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि चौकशी केली.
तेव्हा चोरट्याने त्यांना मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठविली. चोरट्याने त्यांना लिंक उघडण्यास सांगितले आणि ऑनलाइन पद्धतीने पाच रुपये पाठविण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना डेबिट कार्डचा वापर करून ५ रुपये चोरट्याच्या खात्यावर पाठविले. त्यानंतर काही वेळात चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून ९ हजार ९९९ रुपये लांबविले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे तपास करत आहेत.