पुणे : दिवाळीमुळे झेंडूला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मार्केटयार्डातील फुलबाजारात मंगळवारी झेंडूची मुबलक आवक झाली. तसेच इतर फुलांनाही चांगली मागणी होती. झेंडूला प्रति किलोमागे ३० ते १०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.दिवाळीच्या पार्श्वभुमीवर मागील आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची तोड थांबुन ठेवली होती. परंतू दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडूसह इतर फुलांचीही तोड केली आहे. परिणामी मंगळवारी झेंडूसह अन्य फुलांचीही बाजारात चांगली आवक झाली. परराज्यातुनही मोठ्या प्रमाणावर झेंडू बाजारात दाखल झाला आहे. बुधवारी लक्ष्मीपुजन तर गुरूवारी पाडवा असल्याने झेंंडूला अधिक मागणी होती. शहरात मंगळवारी दुपारपासूनच ठिकठिकाणी झेंडूची किरकोळ विक्री सुरू झाली.पुरंदर, बारामती, इंदापुर, दौंड, शिरुर, आंबेगाव, जुन्नर, मुळशी, मावळ या भागांसह मध्यप्रदेश आणि इंदौर या परराज्यातुनही झेंडूची आवक मार्केटयार्डात झाली. स्थानिक मालामध्ये आलेल्या झेंडूमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातुन सर्वात जास्त आवक झाली आहे. बाजारात आलेल्या झेंडूला प्रति किलो ३० रुपयांपासून १०० रुपर्यांपर्यंत भाव मिळाला. किरकोळ बाजारात हा भाव १२० ते १३० रुपयांपर्यंत गेला. झेंडूबरोबरच जुई व पांढऱ्या शेवंतीलाही मागणी असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दिवाळीमुळे झेंडू फुलला!
By admin | Published: November 11, 2015 1:40 AM