पुणे - मस्त गुलाबी थंडी... धुक्याची पसरलेली दुलई…. मनाला चैतन्यमयी करणाऱ्या स्वरांची मनसोक्त पखरण..सतारीच्या मंजूळ तारांनी हृदयाच्या छेडल्या गेलेल्या तारा... ओठातून उमटलेली ' वाह'ची दाद..अशा प्रफुल्लित वातावरणात रसिकांची दिवाळी पहाट सप्तसुरामध्ये न्हायली. गायन आणि वादनाच्या सुरेल अविष्कारानी रंगलेल्या मैफिलीने रसिकांचा पाडवा 'गोड ' झाला. निमित्त होते युवराज ढमाले कॉर्पोरेशन प्रस्तुत लोकमत 'स्वरचैतन्य' दिवाळी पहाट कार्यक्रमाचे.
महालक्षमी लॉन्स येथे पहाटे 5.30 वाजता या स्वरमयी अविष्काराला रसिकांच्या उदंड प्रतिसादात प्रारंभ झाला. प्रसिद्ध युवा गायक राहुल देशपांडे यांच्या गानमैफिलीने स्वर चैतन्याची नांदी झाली. त्यांच्या स्वरांनी आसमंतात मांगल्याचे रंग भरले.
'जाओ जाओ जगह जगह, लंगरवा पिअरवा सोने ना दे' ही बंदिश त्यांनी खुलवली. निखिल फाटक यांच्या तबला साथीला रसिकांनी दाद दिली. सजन आयो रे या बंदीशीबरोबर निर्गुण भजन सादर करून त्यांनी मैफिलीची सांगता केली.
प्रसिद्ध सतारवादक यांचे निलाद्री कुमार यांचे व्यासपीठावर आमगमन होताच रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली.सतारीच्या तारा हळुवारपणे छेडत त्यांनी मैफिलीचा ताबा घेतला. सतारीवर लीलया थिरकणा-या त्यांच्या बोटांची जादू रसिकांनी अनुभवली. त्यांच्या अद्वितीय अविष्काराने रसिकांची पहाट संस्मरणीय झाली.
'लोकमत उपक्रम कायम सुरू ठेवावा'लोकमतने 'दिवाळी पहाट'चा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे तो पुढे कायम सुरू राहावा. कारण अशा कार्यक्रमांमुळे युवा कलाकारांना व्यासपीठ मिळते. "पुना मे एक बार कलाकार को हरी झंडी दिखती है तो आगे जाकर लाल झंडी दिखती नहीं है" - निलाद्री कुमार, आंतराराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक