टाकळी हाजी : कुकडी नदीला पाणी सोडण्याचा निर्णय आज झाल्यामुळे पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या पारनेर, जुन्नर, शिरूर तालुक्यातील जनतेला दिलासा मिळणार असल्याची माहिती विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी दिली.आज कुकडी व चासकमान प्रकल्प पाणीप्रश्नाविषयी पुणे सिंचन भवनात बैठक झाली. या वेळी विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हाधिकारी सौरभ राव, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता ए. डी. कुलकर्णी, चासकमानचे अधीक्षक अभियंता ए. ए. कपोले, शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, भीमाशंकरचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम उपस्थित होते. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर उपस्थित होते. कुकडी नदीला गेल्या दोन महिन्यांपासून पाणी नसल्यामुळे जुन्नर, शिरूर, पारनेर तालुक्यातील नदीकाठावरील ४७ ते ५० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. डाळिंब बागा, चारा पिके जळून गेले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. मळगंगा देवी यात्रेलाही पाणी आले नाही. त्यामुळे पाण्यावाचून भाविक-भक्तांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. शिरूर माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पाण्यासाठी चार ते पाच वेळा बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे दि. ७ ला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कुकडी कालव्यामधून हे पाणी नदीला सोडण्यात येणार आहे. (वार्ताहर)
आवर्तनामुळे दिलासा मिळणार : वळसे-पाटील
By admin | Published: May 05, 2017 2:09 AM