पुणे : मूळचे लोणावळा येथील व सध्या मुंबईत राहणारे उद्योजक प्रदीप गांधी (वय 66) ब्रेन डेड झाल्यावर यांच्या नातेवाईकांनी त्यांचे अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतला. मुंबईच्या हिरानंदानी हॉस्पिटल मध्ये ते दाखल होते. त्यांच्या यकृत, किडनी व त्वचा या अवयदानामुळे तीन रुग्णांना नवीन जीवनाची संजीवनी मिळाली आहे. म्हणजेच एका कुटुंबाच्या अवयवदानाने तीन कुटुंबियांची दिवाळी गोड झाली आहे.
गांधी यांचे यकृत सहा महिन्यांपासून लिव्हर सिरोसिसने ग्रस्त असलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीवर सोमवारी (दि. 24) रोजी हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. नवी मुंबईच्या ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटरला त्यांची त्वचा दान कण्यात आली. तर एक किडनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात पाठवण्यात आली. येथे 2012 मध्ये पहिल्यांदा मूत्रपिंड प्रत्यारोपण केलेल्या 39 वर्षीय महिलेला ही किडनी मिळाली होती. तिचे 2019 पासून डायलिसिस सुरू होते.
गांधी यांना गेल्या दहा वर्षांपासून अल्झायमरचा देखील त्रास होता. ते दि 22 ऑक्टोबरला घरी बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे ते बेशुद्ध झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय दिला होता पण त्याचा उपयोग होईल असे वाटत नव्हते. दरम्यान त्यांना डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले.
गांधी यांनी आपल्या मुलांना प्रत्येक कृतीन समाजाला परत देण्यास मदत केली पाहिजे हे सांगितले होते. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे शरीर अल्झायमरच्या संशोधनासाठी दान करण्यात यावे, असेही सांगितले होते. त्यानुसारच मुलगा प्रणित याने वडीलांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्याची आई जयश्री, भाऊ अमेरिकेतील भाऊ देवांग आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी लगेच सहमती दर्शवली. फक्त देवांग अमेरिकेतून मुंबईत येईपर्यंत अवयव काढण्यासाठीची शस्त्रक्रिया करू नये अशी कुटुंबाची एकच अट डॉक्टरांसमोर होती. रविवारी म्हणजे 23 ऑक्टोबरला गांधींना ब्रेनडेड घोषित केल्यानंतर देवांग आला व पुढील प्रक्रिया पार पडली.
''कुटुंबातील सदस्याचे अवयव दान करण्यासाठी स्वेच्छेने येणाऱ्या कुटुंबाला मी पहिल्यांदाच भेटले आहे. तपासणीत आम्हाला आढळले की गांधी यांचे हृदय आणि फुफ्फुसे प्रत्यारोपणासाठी योग्य नाहीत. म्हणून योग्य असलेले किडनी, यकृत व कातडी यांचे दान केले. प्रत्यारोपणामुळे अवयव प्राप्तकर्त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारेल. त्यांची मोठ्या वैद्यकीय बिलांपासून सुटका होईल. - अर्पिता द्विवेदी, क्रिटिकल केअर इंटेन्सिव्हिस्ट, डॉ. एल. एच हिरानंदानी हॉस्पिटल, मुंबई''