पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टिमचा वापर करुन आवाजाची मर्यादा ओलांडलेल्या मुख्य मिरवणुकीतील किमान ६० मंडळांवर ध्वनी प्रदुषणाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. असा अहवाल या पोलीस ठाण्यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पाठविला आहे. अगोदर होणार्या उपनगरातील विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडणार्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात चंदननगरमधील विनायक तरुण मित्र मंडळाच्या स्पिकरचा आवाज सर्वाधिक ११९.५ डेसिबल नोंदविला गेला होता.
लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोड या चार प्रमुख रस्त्यांवरुन मुख्य गणेश विसर्जन मिरवणुक निघते. फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हे चारही रस्ते येतात. विसर्जन मिरवणुकीत विहीत आवाजाचे पातळीचा डेसिबलचा भंग करुन कर्णकर्कश आवाजात डिजे साऊड सिस्टिम लावून लोकांना त्रास देणार्या मंडळांवर या पोलीस ठाण्यातील पोलीस पथक लक्ष ठेवून होते. अशा मंडळांना सूचना दिल्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पोलिसांनी नॉईज लेव्हल मीटर पथकाला बोलावून मिरवणुकीत चालू असलेल्या डिजे साऊंडची तीव्रता मोजली. क्षमतेपेक्षा अधिक तीव्रता आढळून आलेल्या मंडळाचे अध्यक्ष व डीजे चालक यांच्याकडे त्याची प्रिंट दिली. अनेकांनी त्यावर सही करण्यास नकार दिला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने पोलिसांनी त्यावेळी कारवाई केली नाही. त्यानंतर आता त्याचा अहवाल तयार करुन तो प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याने विसर्जन मिरवणुकीतील २० आणि ईद मिरवणुकीतील २ असे २२ अहवाल तयार केले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्याने १० आणि खडक पोलीस ठाण्याने २५ अहवाल तयार करुन ते प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पाठविले आहेत. याशिवाय कोथरुड, चंदननगर, येरवडा, हडपसर, वानवडी, विमानतळ, कोथरुड पोलिसांनी वेगवेगळ्या गणेश मंडळांचे अध्यक्ष व डिजे चालकावर गुन्हे दाखल केले आहेत.