येरवडा: शिवजयंतीच्या कार्यक्रमात डीजे लावण्यासाठी पोलीस परवानगी देत नाहीत म्हणून विश्रांतवाडी येथील एका मंडळाने थेट येथील भर रस्त्यातच अडविला. आमदारांनी व काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यावर स्पीकरच्या भिंती खाली उतरवून कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र, या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी महाराजा ग्रुपच्या अध्यक्षासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विश्रांतवाडी परिसरात प्रमाणावर महापुरुषांच्या जयंती साजऱ्या केल्या जातात. डीजेच्या तालावर स्पीकरच्या भिंती उभ्या करून विश्रांतवाडी मुख्य चौकात काढल्या जाणाऱ्या मिरवणुका पाहण्यासाठी शहरातून तरुण वर्ग तसेच नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात. मंडळाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी थेट वाहतुकीचा मोठ्या रस्ता मुख्य रस्ताच बंद केला. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डीजेच्या भिंती उभ्या करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे स्पीकर बंद करावा लागेल, असा पवित्रा पोलिसांनी घेतला होता.
याप्रकरणी पोलीस शिपाई मनोज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराजा ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र विष्णू लंगोटे यांच्यासह धनंजय शेवाळे, कुमार धनके, शंभू लंगोटे, अविनाश शिंदे, सचिन जगताप, अक्षय नगरे, सचिन तरकस, आकाश साळुंखे व इतर ४० ते ५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते करीत आहेत.
राग आला आणि मधोमध लावली स्कॉर्पिओ-
शिवजयंती उत्सवानिमित्त विश्रांतवाडी एअरपोर्ट रस्त्यावरील भीमनगर येथे बीआरटी बस स्टॉपच्या कडेला महाराज ग्रुप शिवजयंती उत्सव मंडळाने जागेवर कार्यक्रम घेतला होता. या ठिकाणी सजावट करून डीजे स्पीकर लावण्यात आले होते. मंडळाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक रस्त्याच्या मधोमध स्पीकरच्या तालावर नाचत असताना पोलिसांनी त्यांना रस्त्याच्या कडेला येण्याची वारंवार सूचना केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी एअरपोर्ट रोडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मधोमध स्कॉर्पिओ कार (क्रमांक एमएच १२ केके ७००) ही रस्त्याच्या मधोमध आणून उभी केली. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अटकाव होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शनिवारी शिवजयंतीनिमित्त विश्रांतवाडी येथील एका मंडळाने डीजेसह स्पीकरच्या भिंती उभ्या करत जागेवरच सजावट केली होती. विश्रांतवाडी पोलिसांनी डीजेच्या भिंती उभ्या करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे स्पीकर बंद करून कार्यक्रम थांबविला.