लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ, कानठळ्या बसवणारा आवाज अचानक सुरू झाला आणि एरवी धावपळीत असणाऱ्या भोसरीकरांचे लक्ष वेधले गेले. पुणे-नाशिक महामार्गालगत काही मंगल कार्यालये आहेत. यातीलच एका लग्नाच्या मिरवणुकीत दुमजली डीजे दणदणाट करत होता व त्यापुढे तरुणांची गर्दी नाचत होती.वाहतुकीच्या गोंगाटापेक्षाही या डीजेचा दणदणाट अधिक होता. कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि काही वेळातच तत्पर पोलिसांची मोबाईल व्हॅन सायरन वाजवत घटनास्थळी दाखल झाली आणि डीजे चा आवाज अचानक शांत झाला. पण फक्त आवाज कमी करण्यास सांगून पोलीस आल्या वाटेने निघून गेले. पोलीस गेल्यानंतर पुन्हा डीजे चा दणदणाट चालूचहोता. सध्या लग्नसराई असल्यामुळे भोसरीत मुहूर्ताच्या दिवशी मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी व व ध्वनिप्रदूषणाला भोसरीकर तोंड देत आहेत. त्यातच राजकीय वरदहस्त असणाऱ्या महागड्या लग्नामध्ये अजूनही डीजे लावण्याचा मोह वधू-वर पक्षाला टाळता येत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मिरवणूक व वरातीसाठी महागडे डीजे लावले जात आहेत. त्याचा दणदणाट कानठळ्या बसवणारा असून वयोवृद्ध व रुग्ण नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. भोसरीच्या आळंदी रस्त्यावरील काही मंगल कार्यालयांच्या बाहेरही अशाच प्रकारे मिरवणूक काढून डीजेचा दणदणाट केला जातो. परिसरात रुग्णालये व शाळा असल्याने हा परिसर शांतता क्षेत्रात मोडतो तरीही या भागात नेहमीच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केले जाते. आणि पोलीसही फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. आवाज कमी करायला सांगणे ही एवढीच काय ती कारवाई भोसरी पोलीस डीजेवर करत आहेत.
डीजेचा दणदणाट भोसरीत कायम
By admin | Published: May 22, 2017 5:00 AM