पुण्यात विसर्जन मिरवणुकीत काही ठिकाणी डीजे सुरु , ढोलपथकांची अरेरावी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 04:21 PM2018-09-23T16:21:42+5:302018-09-23T16:24:33+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाने डीजेवर बंदी कायम असताना सुध्दा काही ठिकाणी डीजे सुरु असल्याचे प्रकार निदर्शनास आला.
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाने डीजेवर बंदी कायम असताना सुध्दा काही ठिकाणी डीजे सुरु असल्याचे प्रकार निदर्शनास आला. तसेच मिरवणुकीत ढोलपथकांची नागरिक, महिला, एव्हाना पत्रकारांना सुध्दा अरेरावीची भाषा व धक्काबुक्की करण्यात आल्याचे प्रसंग पाहायला मिळाले. शहरातील उपनगरातील गणेश मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाला कात्रजचा घाट दाखवत जोरदार आवाजात डीजे सुरु केला आहे. पोलीस प्रशासनाने डीजे वापरणाऱ्या मंडळावर लक्ष केंद्रित केले आहे. काही वारजे, कोंढवा, कर्वेनगर आदी भागातील डीजे वापरणाऱ्या मंडळावर कारवाई देखील केल्याची माहिती समोर येते आहे.
मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुक व ढोलपथकांचे वादन पाहण्यासाठी पुणेकर नेहमी गर्दी करतात. मात्र, यावर्षी डीजेवर बंदी असल्यामुळे ढोल पथकांचेच वर्चस्व मिरवणुकीवर राहणार हे निश्चितच होते. परंतु, काही ढोलपथकाकंडून नागरिक महिला व पत्रकारांनी उर्मटपणे अरेरावीची भाषा वापरण्यात आली. भाविकानाच नव्हे तर पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. वादनकौशल्य सादर करणाऱ्या ढोलपथकांमधील काहीजण स्वत:ला मिरवणुकीचे स्वयंभू व्यवस्थापक समजू लागले आहेत. मिरवणुकामध्ये महिला, लहान मुले यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असताना दुसरीकडे ढोलपथकांचा कमालीचा आततायीपणा पाहायला मिळाला . पोलिसांनी शिस्तीचे पालन करण्याची सूचना देऊन देखील त्यांच्या कृतीत फारसा फरक पडला नाही. एकाच जागी उभे राहून बराच काळ वादन केल्यामुळे प्रमुख रस्त्यावरील चौकात गर्दी होत आहे. नागरिकांना त्या गर्दीतून बाहेर पडणे शक्य होत नसल्याने जिथून जागा मिळेल तिथून बाहेर पडण्याचा रस्ता ते शोधतात. यासगळ्यात ढोलपथके आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले त्यांच्याच कार्यकत्यांचे सुरक्षापथक नागरिकांना बाहेर लोटण्याचे काम करते. यामुळे जागा मिळणे तर अवघड परिणामी चेंगराचेंगरी जास्त होत असल्याचे दिसून आले.