पुणे : गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा लहान मुले, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान मद्यपान आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवणे सरकार सहन करणार नाही, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गणेशमंडळांना दिला.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, महापालिका आयुक्त सौरभ राव, अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, तसेच इतर पोलीस अधिकारी व गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत गणेश मंडळाच्या विविध मागण्या मान्य केल्या. पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी गणेश मंडळांना गणेशोत्सवादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास दिला. तर सौरभ राव म्हणाले, महापालिकेकडून गणेश मंडळांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. गणेश मंडळांनी परवानगीसाठी आॅनलाईन तसेच आॅफलाईन अर्ज करावेत. मागील तीन दिवसांपासून आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली.