लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : २१ वर्षांचा तरुण घरातून बेपत्ता झाला. दौंड पोलिसांना एक मुंडके नसलेले शरीर नदीच्या प्रवाहात सापडले. बेपत्ता तरुणाचा तो मृतदेह असल्याची खात्री नातेवाईकांनी दिली. त्यावरुन लोणी काळभोर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात २०१८ मध्ये तिघांना अटक केली. त्यांच्यावर खटला सुरू झाला. त्यावेळी डीएनए चाचणीचा अहवाल आला. ज्याचा मृतदेह असल्यावरून तिघांवर खुनाचा खटला दाखल झाला होता. प्रत्यक्षात त्या भीमाशंकर याचा तो मृतदेहच नसल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयाने तिघांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे एनडीए अहवालामुळे तिघा तरुणांचे आयुष्य वाचले आहे.
केशव सोपान काळभोर (वय ३८), हरिदास नामदेव शेडगे (वय ३४) आणि प्रशांत वालचंद जगताप (वय २६, तिघे रा. तरवडीमळा, लोणी काळभोर) अशी निर्दोष सुटका झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर भीमाशंकर कल्लप्पा आतनूरे (वय २१, रा. लोणी काळभोर) असे बेपत्ता झालेल्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, भीमाशंकर आतनूरे हा १८ ऑगस्ट २०१८ रोजी घरातून प्रशांत जगताप यांच्या दुचाकीवर बसून बाहेर गेला होता. तो घरी न आल्याने नातेवाईकांनी लोणी काळभोर पाेलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दौंड पोलिसांना एक मुंडके नसलेले शरीर नदीच्या प्रवाहात सापडले होते. भीमाशंकरच्या नातेवाईकांनी तो मृतदेह पाहून त्याचे वाढलेले नख आणि अंडरवेअर यावरून तो भीमाशंकरचा मृतदेह असल्याचे ओळखले. भीमाशंकरच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. मृतदेहाचे मुंडके नसल्याने पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहाचे व भीमाशंकर यांच्या नातेवाईकांचे सॅम्पल डीएनए चाचणीसाठी पाठवले.
बारामती जिल्हा न्यायालयात या खटल्याची जानेवारीमध्ये सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षाने भीमाशंकरच्या कुटुंबीयांसह ९ साक्षीदार तपासले. भीमाशंकरच्या आईने साक्ष देताना सांगितले की, आम्ही केशव काळभोर यांच्याकडे गडी म्हणून कामाला होतो. भीमाशंकर हा त्यांच्या मुलीशी बोलतो व मैत्री करतो, म्हणून काळभोर यांनी दम दिला होता. तिच्याशी कोणत्याही प्रकार संबंध ठेवून नकोस नाही तर तुझे बरे वाईट होईल, अशी धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनीच त्याचा खुन केला, अशी साक्ष भीमाशंकरचे भाऊ व बहिण यांनी दिली होती. दरम्यान, डिसेंबरमध्ये डीएनए अहवाल आला होता.
आरोपींच्या वतीने ॲड. मिलिंद पवार, ॲड. ज्योती वh रकर -भोंडवे व ॲड मंगेश खराबे यांनी युक्तिवाद केला.
ॲड. मिलिंद पवार यांनी युक्तिवादात सांगितले की, भीमाशंकर काम शोधण्यासाठी जातो, असे सांगून घरातून गेला होता. त्याला आरोपींबरोबर कोणी पाहिलेले नाही. आजही पोलिसांना भीमाशंकरचे मुंडके मिळून आलेले नाही. दौंड पोलिसांनी ते मुंडके नसलेले शरीर भीमाशंकरचेच हाेते हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांचे डीएनए चाचणीसाठी रक्त व इतर महत्वाचे नमुने घेतले होते. पण डीएनए चाचणीचा अहवालानुसार ते शरीर भीमाशंकरचे नाही. त्या शरीराचे भीमाशंकरचे आईवडील नाहीत. भीमाशंकर आजही बेपत्ता आहे. त्यामुळे भीमाशंकरचा खून झाला आहे, हेच सिद्ध होऊ शकत नाही. जे शरीर सापडले ते भलतेच कोणाचे तरी आहे. दौंड पोलिसांनी फक्त संशयावरून खोटा व मृतदेहाची खातरजमा न करता गुन्हा दाखल केला व अटक केली असा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरुन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. आर. राठी यांनी तिघांनाही सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.