पोलिस आयुक्त : लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले असून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. असे असले तरी अजूनही ही संख्या खूप कमी झालेली नाही. त्यामुळे शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक होणार आहे. लोकांनी महत्वाची कामे सकाळी अकराच्या आतच पूर्ण करावीत. दुपारी बारा वाजल्यापासून लॉकडाऊनची आणखी कडक अंमलबजावणी करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
राज्य शासनाने पुण्यात कडक लॉकडाऊन करण्याचा विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने नुकतीच केली होती. संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ येण्याआधीच खबरदारी घ्यावी, या हेतूने शहर पोलिसांनी आता नाकाबंदीची व्याप्ती वाढविली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे व इतर वरिष्ठ अधिकारी स्वत: रस्त्यावर उतरुन दररोज शहरातील विविध भागात भेटी देऊन नाकाबंदीची पाहणी करीत आहेत. उत्तमनगर, स्वारगेटसह शहरातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पाहणी केली. काही ठिकाणी बंदोबस्तात उणिवा दिसून आल्या. त्याबाबत त्यांनी सूचना केल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना मोकळीक दिली आहे. असे असले तरी नागरिकांनी आपल्या परिसरातच वाहनांचा वापर कमीत कमी करावा.
सकाळी नागरिक वेगवेगळी कारणे सांगत असतात. त्यातून रस्त्यावर पोलीस आणि नागरिक यांच्यात काही वेळा वादाचे प्रसंगही येत असताना दिसून येतात. दुपारपासून रस्त्यावर आलेल्या प्रत्येक नागरिकांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
चौकट
“नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावे. दुपारी १२ नंतर रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे.”
-अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे