बारामती : समाजासाठी कोणतेही काम निष्ठापूर्वक करा. त्या कामातूनच समाज परिवर्तन घडू शकते. राज्य शासनाच्या ग्रामीण व सामाजिक विकासासाठी अनेक योजना आहेत. मात्र, आपण त्या योजना राबविण्यासाठी कमी पडतो. परिणामी गावांचा विकास थांबतो. गावातील विकास हा गावातील लोकप्रतिनिधींना समजणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
यशदा अंतर्गत नवनिर्वाचित सरपंचांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी सत्र समन्वयक एस. डी. बिरासदार, आर. टी. दिघडे, प्रशिक्षण प्रमुख सचिन खलाटे, आनंद दरवेशी, असीम शेख यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, माळशिरस तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड, खेड, मुळशी तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाल्या, मागील दीड वर्षापासून देशासह जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या काळात लोकांची वाताहत झाली आहे. या काळात आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय बदल केले पाहिजेत, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. आपण कुठे कमी पडतो, याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची आणि अनुभवी मार्गदर्शकाची गरज असते.
स्वच्छता, पाणी, शाळा, आरोग्य, शिक्षण, बचत गट, स्वयंरोजगार, वृक्षारोपण, पर्यावरण अशी अनेक कामे आपण राबविली पाहिजेत. सरपंच म्हणून आपण स्वत:ला सेवक समजावे, उगाच सरपंच म्हणून मिरविण्यापेक्षा आपण लोकांना विकासाच्या कामातून न्याय देण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी खूप विश्वासाने आपल्याला जबाबदारीने निवडून दिले आहे. कोरोनातून लोकांचे आर्थिक, कौटुंबिक नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत असताना आता महापुराचे संकट आले आहे. अनेक संकट असतात यात सरपंच अथवा गावचा पालक म्हणून स्वत:ची भूमिका महत्त्वाची आहे. गावच्या विकासात राजकारण खूप असते, यातून गावचा विकास रखडतो. सरपंच म्हणून आमच्या जबाबदाऱ्या ओळखून आपण समाजासाठी काम करा, असे आवाहन पवार यांनी केले.
—————————————————