त्यामुळे दुसऱ्या वर्षापासून मुलांसमोर आपले आचरण कसे आहे त्यावर मुलाच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाची जडण-घडण होत असते. त्यासाठी त्यांनी काढलेली चित्रे, चांगले संभाषण, आदी गोष्टींबाबत मुलांना पालकांनी प्रोत्साहन देणे खूप गरजचे असते, मुलांकडून एखादी चूक झाली तर त्याची शिक्षा देताना मारणे किंवा ती मुले अगदी बिघडली आहेत असे वर्तन न करता त्यांना त्यांची चूक झाली हे लक्षात आणून देणं महत्वाचे आहे. जेणे करून तशी चूक त्यांच्याकडून पुन्हा होणार नाही उदा. मुलांनी काही अपशब्द वापरले तर त्याला मारण्यापेक्षा समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. मुलांना केवळ शाळेतील अभ्यास घेण्यापेक्षा बाहेरच्या जगाचे ज्ञान गोष्टीच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून देणे आश्यक आहे. त्यासाठी त्यांना बागबगीच्या आदी ठिकाणी घेऊन जाणे, तेथील विविध झाडे, पक्षी यांची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या भाषेच्या विकासासाठी त्यांच्याबरोबर सारख्या गप्पा मारणे, पेपर मोठ्याने वाचताना एखादी बातमी किंवा बोधकथा सांगणे अशातून मुलांची शब्द संपत्ती वाढते. त्यांच्याबरोबर विनोद शेअर करणे हेही महत्त्वाचे व शब्दसंपत्तीसाठी पोषक ठरेल. त्यांना रंगांची ओळख करून देताना केवळ रंग दाखविणे महत्त्वाचे नाही तर त्यांना प्रत्यक्ष चित्र काढायला लावणे महत्वाचे.
दोन-तीन वर्षांच्या मुलांमध्ये प्रत्येक गोष्टीची उत्सुकता कमालीची असते. त्याची प्रशंसा करणे महत्त्वाचे ठरते. त्यांचे आरोग्य व्यवस्थित असेल की त्यांचा भावनिक व बौद्धिक विकासही छान होतो. त्यासाठी त्यांना पोषक आणि सकस आहार महत्त्वाचा आहे. या वयात अनेक मुले काही वेळेस कमी खातात मात्र त्यामुळे त्यांच्यावर जबरदस्ती न करता त्यांना दोन-तीन तासांनी सारखे थोडे थोडे खायला देणे महत्त्वाचे आहे.
सध्या इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट वापरणे अनिवार्य असले तरी त्यांच्या वापराची मर्यादा ठेवा आणि प्रत्यक्ष संवाद ठेवणे महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा. विभक्त कुटुंब पद्धतीत राहत असलात तरी त्यांना आजी-आजोबा नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्यात राहण्याची त्यांच्याशी बोलण्याची व ते नाते छान जपण्याची सवय लावा, एकटेपणापेक्षा माणसांची सवय असणे हे मानसिक व बौद्धिक विकासासाठी महत्त्वाचे ठरते.
--
डॉ. स्नेहल राज्यगुरू