महावितरणाचे आवाहन : फसवणूक होण्याची शक्यता
बारामती : महावितरणच्या ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी स्वत:च्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे मोबाईल अॅप, महावितरण संकेतस्थळ तसेच युपीआय आदी पर्यायांचा वापर करावा किंवा नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावरच वीजबिल भरावे, असे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे ऑनलाईन असल्याने वीजबिलाचे पैसे महावितरणला मिळताच ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वीजबिल मिळाल्याचा संदेश प्राप्त होतो. ग्राहकांनी या संदेशाची पडताळणी करावी, अन्यथा मेसेज न मिळाल्यास ती फसवणूक असू शकते असे आवाहन असेही महावितरणने म्हटले आहे.
राज्यात ६५ लाख, तर बारामती परिमंडलात ४ लाख २४ हजार वीजग्राहक वीजबिल भरण्यासाठी विविध ऑनलाईन पर्यायांचा वापर करतात. मागील काही वर्षांपासून महावितरणने वीज ग्राहकांसाठी आॅनलाईन वीजबिल भरण्यासाठी संकेतस्थळासह, मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या अॅपद्वारे स्वत:च्या अनेक वीजजोडण्या हाताळता येतात. त्यामुळे दिवसेंदिवस वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी 'ऑनलाईन' वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती वाढलेली आहे. त्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट सुद्धा देण्यात येते. ज्या ग्राहकांना ऑनलाईन पर्यायांचा वापर करता येत नाही. अशा ग्राहकांसाठी महावितरणने अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांची व्यवस्था केली आहे. बारामती परिमंडलात ११८९ अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे आहेत.
यामध्ये महावितरणाची ५२ , पतसंस्था २५२, सहकारी बँका ३१, जिल्हा बँकेची ६४१ व ईवॉलेटच्या २१३ भरणा केंद्रांचा समावेश आहे. या भरणा केंद्रांना महावितरणने अधिकृत सॉफ्टवेअर दिले असून, हे ऑनलाईन काम करते. त्यामुळे या सर्व केंद्रांवर जे ग्राहक पैसे भरतात त्यांना पावतीसोबत महावितरणतर्फे अधिकृत संदेश पाठवून पैसे मिळाल्याची पोहोच दिली जाते. त्यामुळे ग्राहकांना खात्री पटते. काही ठिकाणी अनधिकृत व्यक्ती वीजबिल भरून देतो म्हणून पैसे ठेवून घेतात. गर्दीचे कारण सांगून ग्राहकांचे पैसे वापरल्याचे काही प्रकार समोर आल्याने महावितरणने अधिकृत भरणा केंद्रावरच वीजबिल भरणा करण्याचे किंवा स्वत:हून ऑनलाईनचा पर्याय निवडण्याचे व मोबाईल संदेशाद्वारे भरणा केल्याची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.
---------------------