पुणे : महिलांनी ‘पॉवरफुल’ आणि ‘सक्सेसफुल’ होताना कोणतीही लाज बाळगण्याची गरज नाही. कुठल्याही क्षेत्रात यशस्विततेच्या शिखरावर पोहोचत असताना अनेकदा मनात अपराधी भावना निर्माण होते; मात्र स्वत:ला कमी न लेखता स्वत्व जपत पुढे जात राहण्यातच हित आहे, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी केले.लोकमत माध्यमसमूहाच्या वतीने आयोजित एनईसीसी, युनिसेफ आणि यूएन वुमेन यांच्या सहयोगाने आयोजित ‘लोकमत वुमेन समीट’च्या सहाव्या पर्वाचे उद्घाटन सोमवारी थाटात झाले. ‘अस्तित्व तिच्या नजरेतून’ ही यंदाची संकल्पना होती. या वेळी आॅलिम्पिकवीर कुस्तीपटू गीता फोगट, युनिसेफच्या अॅडव्होकसी व कम्युनिकेशन प्रमुख अलेक्झांड्रा वेस्टरबिक, युनिसेफच्या मुंबई कार्यालयातील अधिकारी राजेश्वरी चंद्रशेखर, व्हीयू टेक्नॉलॉजीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डिझाईन प्रमुख देवीता सराफ, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, सानिया सेठ, अजमेरा हाऊसिंगच्या संचालक हिता अजमेरा, राजकीय विश्लेषक नीरजा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होत्या. लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. विद्या बालन म्हणाल्या, ‘‘चित्रपटातून समाजाच्या वास्तवतेचे प्रतिबिंब उमटते; परंतु माझ्या मते, चित्रपट सामाजिक प्रबोधनाचे नव्हे तर मनोरंजनाचे माध्यम आहे. पण, त्यातून प्रेक्षकांना नक्कीच चांगला संदेश सोबत घेऊन जाता येतो. त्यामुळे चित्रपटातील भूमिका साकारताना माझ्या धारणांचा, विश्वासाचा विस्तार होत असतो.’’विद्या बालन म्हणाल्या, ‘‘डर्टी पिक्चर’ केल्यानंतर भारताच्या ‘क्लीन पिक्चर’साठी काम करताना माझ्यासमोर आलेले आकडे खूप भयंकर होते. महिलांना उघड्यावर शौचास जावे लागणार असेल, तर त्याचा थेट संबंध सुरक्षा, आरोग्य आणि सन्मानाशी आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी मी अनेक ठिकाणी फिरले. जनजागृती ही बदलाची पहिली पायरी आहे, हे जाणवले. अनेकांना मी अभिनेत्री म्हणून माहीत नाही; मात्र ‘जहाँ सोच, वहा शौचालय’मधील प्रतिमादूत म्हणून परिचित आहे, याचा अभिमान वाटतो.’’पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘ लोकमतच्या वुमेन समीटमधून महिलांना उर्जा मिळेल.’’विजय बाविस्कर यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. अजिंक्य देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.या परिषदेचे असोसिएट प्रायोजक अजमेरा हाऊसिंग कॉर्पोरेशन, नॉलेज पार्टनर रोझरी ग्रुप आॅफ स्कूल, एज्युकेशन पार्टनर सिंहगड इन्स्टिट्यूट, हॉलिडे पार्टनर मँगो हॉलिडेज, टीव्ही पार्टनर एनडीटीव्ही प्राईम, ट्रॅव्हल पार्टनर रेव्हेल ग्रुप, हॉस्पिटॅलिटी पार्टनर जे. डब्ल्यू. मेरियट, आऊटडोअर पार्टनर सुरेखा आऊटडोअर, लक्झरी पार्टनर आॅडी इंडिया, ब्यूटी पार्टनर आयएसएएस आहेत.
‘पॉवरफुल’ होताना लाज बाळगू नका
By admin | Published: March 21, 2017 5:07 AM