पुणे : इतिहासाचे लेखन करताना उगाच कल्पना आणि प्रतिभेचे पंख उडवू नयेत. लोकांना रूचणार नाही, अशा प्रकारे इतिहासात बदल केल्यास संस्कृतीबद्दल वाद उद्भवू शकतात आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशा शब्दात ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लेखकांना टोला लगावला. वसंत वसंत लिमये यांच्या ‘विश्वस्त’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. साचेबद्द चौकटीमधील प्रकाशन सोहळ्याला बगल देत ‘बुक टे्रलर’ या अभिनव संकल्पनेच्या मांडणीतून या कादंबरीचा चित्तथरारक प्रवास रसिकांसमोर उलगडण्यात आला. रंगमंचावरील नेपथ्य, कार्यक्रमाला एका सूत्रात बांधणारा संचालक, चार अतिथीगण, नाट्यरूपांतर, अभिवाचन अशा रंजक सादरीकरणातून कादंबरीसह लेखकाच्या भावविश्वाचे विविधांगी पदर हळूवारपणे रसिकांसमोर उलगडले. सूत्रसंचालकाच्या भूमिकेतील सौमित्र ऊर्फ किशोर कदम हे पाहुण्यांशी संवाद साधत या कादंबरीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करीत होते. कवी संदीप खरे आणि भार्गवी चिरमुले यांनी अभिवाचनातून कादंबरीची उत्सुकता वाढवत नेली.देगलूरकर म्हणाले, ‘‘भाषासौष्ठव हे ‘विश्वस्त’ या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. मात्र काल्पनिक इतिहासाचे लेखन करताना उगाच कल्पना आणि प्रतिभेच्या भराऱ्या घेता कामा नयेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रतिभेच्या आधारावर साहित्याची निर्मिती केली जाते, हा गैरसमज आहे त्याला अभ्यासाची जोड हवी, असे संजय भास्कर जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कल्पनेच्या भराऱ्या नको
By admin | Published: February 20, 2017 3:02 AM