पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत मेव्हण्यानेच एकाला १४ लाखांना गंडा घातला आहे. २०१२ ते २०१३ या कालावधीमध्ये हा प्रकार घडला असून, सेबीने पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश रासकर (रा. नटराज चौक, गोंधळेनगर, हडपसर), अशोक मुक्तागिरी पळसे (रा. अलिपूर रस्ता, बार्शी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भूषण अन्नदाते (वय ५५, रा. राणाप्रताप चौक, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी पळसे हा अन्नदाते यांचा मेव्हणा आहे. पळसे याने अन्नदातेंना त्याचा मित्र रासकरमार्फत शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी १४ लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीचे काही महिने आरोपींनी त्यांना ७ टक्क्याने परतावा दिला. त्यानंतर पैसे देणे बंद केले. याबाबतीत चौकशी करण्यासाठी त्यांनी रासकरच्या मेगा सेंटरमधील कार्यालयात जाऊन चौकशीचा प्रयत्न केला. मात्र, हे कार्यालय बंद होते. याबाबतीत अन्नदाते यांनी सेबीला पत्र लिहिले. त्यांनी रासकरला अशा प्रकारे कोणतीही गुंतवणूक घेण्याची परवानगी देण्यात आलेली नसल्याचा खुलासा आला. त्यानंतर, सेबीने याबाबतीत पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रारीची दखल घेण्यास कळवले. त्यानुसार, हे प्रकरण हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. हडपसर पोलिसांनी अन्नदाते यांच्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला आहे.
परताव्याच्या आमिषाने मेव्हण्याने घातला गंडा
By admin | Published: March 25, 2017 4:10 AM