पुणे : सातत्याने मार्गात बंद पडणाऱ्या बसेस, तुटलेले सिट्स, खिळखिळ्या झालेल्या बसेस यांमुळे टीकेची धनी झालेली पीएमपी त्यांच्या चालकांच्या मुजाेरपणामुळे अधीकच चर्चेत असते. अाता पुण्याच्या वाहतूक पाेलिसांकडून नाे ट्रॅफिक व्हायलेशन झाेन तयार करण्यात अाले असून 19 ते 27 अाॅक्टाेबर दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये ही माेहीम राबविण्यात येणार अाहे. यात अाता पीएमपी सुद्धा सहभागी हाेणार असल्याने पीएमपी प्रशासनाने चालकांना नियमांचे पालन करण्याची तंबीच दिली अाहे. त्यामुळे या माेहीमेदरम्यान तरी पीएमपीचे चालक नियमांचे पालन करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे.
दारु पिऊन बस चालवणाऱ्या चालकाचे प्रकरण नुकताच समाेर अाले हाेते. चालकांच्या उद्धट वागण्याच्या अनेक तक्रारी राेज पीएमपीकडे येत असतात. अनेक पीएमपी चालक वाहतुकीच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करतात. त्यात झेब्रा क्राॅसिंगवर बस थांबवणे, सिग्नल न पाळणे, डाव्या बाजूने बस न चालवणे असे प्रकार तर राेज घडत असतात. अनेकदा मार्गात बंद पडलेल्या बसेस बराच वेळ तेथेच पडून असतात. त्यामुळे माेठी वाहतूक काेंडी हाेत असते. मार्गातल्या बसेस लवकर बाजूला करण्यासंदर्भात वाहतूक पाेलिसांनी पीएमपीचे कान सुद्धा उपटले हाेते. परंतु त्याचा फारसा परिणाम न झाल्याचे चित्र अाहे. अाता वाहतूक पाेलिसांकडून नाे ट्रॅफिक व्हायलेशन झाेन तयार करण्यात अाले असून 19 ते 27 अाॅक्टाेबर दरम्यान ही माेहीम राबविण्यात येणार अाहे. यात पीएमपी सहभागी झाली असून पीएमपीच्या वाहतुक व्यवस्थापकांनी चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात अादेश दिले अाहेत. तसेच बस बंद पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी मेंटेनन्स विभागाला बसेसची याेग्य देखभाल दुरुस्ती करण्यास सांगण्यात अाले अाहे.