पुणे : शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे भवितव्य उज्ज्वल घडावे यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासन लागेल ती मदत करायला तयार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड मुख्याध्यापकांनी करू नये असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी केले. गणेश कला क्रीडा मंदिर येथे यंदा पहिल्यांदाच जिल्हास्तरीय पातळीवर मुख्याध्यापक शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी ही परिषद केंद्रस्तरावर घेतली जात होती. जिल्हयातील मान्यताप्राप्त सर्व माध्यमांच्या १ ली ते १२ वी पर्यंतचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बालभारती तसेच विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर, उपसंचालक मिनाक्षी राऊत, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ.गणपत मोरे, सहायक शिक्षण निरीक्षक प्रा. अनिल गुंजाळ, माजी शिक्षण संचालक शिवाजी तांबे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता कशी हेरावी, विद्याार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणावे, विद्याार्थ्यांची शैक्षणिक, शारीरिक, मानसिक गरजा कशा ओळखाव्यात, शाळेत आनंदी वातावरण कसे ठेवावे याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या तसेच एकंदरीत शिक्षणाच्या गुणवत्तावाढीची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. स्वत: च्या मुलांचे भवितव्य घडवताना अनेक अडचणी येतात. तरीही पालक म्हणून त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे विशाल सोळंकी यांनी सांगितले. प्रा. अनिल गुंजाळ म्हणाले, विद्यार्थ्यांचे पाय पाळण्यात दिसतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता काय आहे, यावरून त्याला योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांपेक्षा आज शिक्षणाची वाईट अवस्था झाली असल्याची खंत शिवाजी तांबे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पध्दतीत आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापनात काळानुसार बदल घडणे गरजेचे असल्याचे सांगितले. यानंतर आरटीई प्रवेश तसेच शुल्क अधिनियम कायदा आणि विविध शिष्यवृत्त्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत तडजोड नको : विशाल सोळंकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 2:30 PM
गणेश कला क्रीडा मंदिर येथे यंदा पहिल्यांदाच जिल्हास्तरीय पातळीवर मुख्याध्यापक शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी ही परिषद केंद्रस्तरावर घेतली जात होती.
ठळक मुद्देमान्यताप्राप्त सर्व माध्यमांच्या १ ली ते १२ वी पर्यंतचे मुख्याध्यापक, प्राचार्य परिषदेसाठी निमंत्रित