पुणे : मेट्रोच्या कामामुळे डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्याला धोका निर्माण झाला. त्याविरोधात पक्षीप्रेमींनी सातत्याने आंदोलन केले. आता खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुणे महापालिका आयुक्तांना पत्र लिहून याबाबत योग्य ती काळजी घेऊन अभयारण्याला नुकसान होणार नाही, यावर लक्ष द्यावे, असे सांगितले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेला हे पत्र अद्यापही मिळालेले नाही. वनाज ते रामवाडी मेट्रोचा मार्ग कल्याणीनगर येथून जात आहे. पूर्वी हा मार्ग आगाखान पॅलेस जवळून जात होता. परंतु, ते राष्ट्रीय स्मारक असल्याने त्याच्या बाजूने मार्ग नेता येत नव्हता. म्हणून हा मार्ग कल्याणीनगर येथील नदी पात्रातून केला जात आहे. त्यामुळे येथील डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्याला धोका निर्माण झाला आहे. त्याविरोधात अनेकदा नागरिकांनी रस्त्यावर येऊन विरोध केला. परंतु, मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मार्ग या अभयारण्याच्या बाजूने जाणार असल्याचे सांगितले. आता याबाबतची दखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. त्यांनी देखील पक्षी अभयारण्याला नुकसान होणार नाही, असे पत्र पुणे महापालिकेला पाठविले आहे. याबाबत पुणे महापालिकेकडे विचारणा केली असता, त्यांना अद्याप तरी हे पत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. खरंतर मुनगंटीवार यांनी पत्र लिहून २५ दिवस होऊन गेले आहेत. एवढ्या दिवसात पत्र मिळाले नसेल, तर यात काहीतरी गडबड असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले आहे. याबाबत पक्षी संशोधक धर्मराज पाटील म्हणाले,‘‘वनमंत्र्यांनी याबाबत लक्ष घातल्याने पक्षी अभयारण्यासाठी सकारात्मक बाब आहे. त्यांचे पत्र स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले पाहिजे. तरच त्याचा उपयोग होणार आहे. कारण पक्षी अभयारण्यात जैवविविधता आहे. ते वाचविणे आवश्यक आहे.’’
पुणे महापालिकेकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्याबाबत पाठविलेले पत्र अद्याप मिळालेले नाही. - मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका