जुगल राठी
लोकमान्य टिळकांनी समाज एकत्र येण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. उत्सवातून समाजप्रबोधन व्हावे, हा त्यांचा मूळ हेतू होता. गणेशोत्सव सामाजिक बांधिलकी जपून साजरा करावा. पुण्यातील गणेशोत्सवाची जागतिक पातळीवर नोंद केली जाते. भारतीय संस्कृतीत सण, उत्सवांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. ही गोष्ट लक्षात घेऊन टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाला सुरुवात केली. सध्याच्या परिस्थितीत पुण्यात गणेशोत्सवाला मर्यादा राहिली नाही. उत्सव म्हणजे आनंद असायला पाहिजे.
लोकांना त्रास व्हायला नको, याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याचे विद्रुपीकरण झाल्याने उत्सवात आनंद राहत नाही. ढोल-ताशा हे पारंपरिक वाद्य आहे असे म्हणतात, पण मंडळांनी त्याची मर्यादा ओलांडली आहे, तसेच पुण्यात अनेक पथकांची संख्या वाढली आहे. मंडळासमोर ढोल पथक लावले की, मिरवणूक थाटात होते, पण एका मंडळाने एक पथक लावले आणि नियमांचे उल्लंघन केले नाही, तर आवाजाचा त्रास होणार नाही. गणेशोत्सवात समाजप्रबोधन होणे ही काळाची गरज आहे. घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकबंदी, प्रदूषण, नदी सुरक्षा, पर्यावरण वाचवा, स्त्री सुरक्षा या असे विषय हाताळणे गरजेचे आहे. गणेशोत्सवात सहभागी होणारी मंडळे, संस्था, सामान्य माणूस संवेदनशीलता विसरत चालला आहे. या वर्षी कोल्हापूर सांगली भागात पूर आला. याची जाणीव ठेवून आपण उत्सव साजरा केला पाहिजे. लोकांचे संसार वाहून गेले. त्यांना मदत करण्याबरोबरच दु:खात सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे. उत्सवात गर्दी, वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर दिसून येते. गर्दीचा लोकांना त्रासही होतो. चोरी करण्याचे प्रमाणही वाढते. रस्त्यांवर गर्दी होऊ नये, यासाठी मंडळांनी जबादारी घेणे गरजेचे आहे. पोलीस सर्व ठिकाणी लक्ष देत असतात. कार्यकर्त्यांनी उत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करावे. वाहतूककोंडी कमी होण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाहीत. कोणाचा मांडव मोठा यामध्ये स्पर्धा चालू झाली आहे. अरुंद रस्ते त्यात या मांडव, कमानी यांची भर पडते. याचा सामान्य नागरिकाला त्रास होत आहे. नियम पाळूनच सर्व गोष्टी केल्या, तर लोकांना उत्सवातून आनंद घेता येईल. मांडवाच्या खाली होणारे गैरप्रकार, उत्सवातील चुकीच्या गोष्टी, यामुळे तो उत्सव राहत नाही. चांगल्या गोष्टींना कधीही विरोध होणार नाही.
लेखक सामाजिक कार्यकर्ते, पुणे.