जेजुरी : शासनाने विकासाचे मनोरे जरूर रचावेत, आमचा विकासाला कधीही विरोध राहणार नाही; मात्र शेतक-यांची थडगी रचून कोणालाही विकासाचे मनोरे आम्ही बांधू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोथळे येथे दिला आहे.येथे जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येणाºया कोथळे ते जेजुरी या ८६ लाख रुपये खर्चाच्या कामाचा, साठवण बंधाºयाच्या कामाचा शुभारंभ व ज्ञानरंजन वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राजू शेट्टी, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी अध्यक्ष प्रदीप कंद, मनसेचे नेते बाबा जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, माजी उपसभापती माणिकराव झेंडे, बाजार समितीचे संचालक अॅड. धनंजय भोईटे, संभाजी काळाणे, सुनील आस्वलीकर, गंगाराम जगदाळे, बाळासाहेब धाबेकर आदी उपस्थित होते. या वेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील पारगाव व सात गावांना उद्ध्वस्त करून तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिक बाधित शेतकºयांनी याबाबत आपणास माहिती दिली आहे. शेतकºयांची संमती असेल तर कोणीही विमानतळास विरोध करणार नाही; मात्र दहशत वा फसवाफसवी करून विमानतळ होऊ देणार नाही. विरोधासाठी सर्वांच्या पुढे आपण असू. विमानतळाला एक इंचही जमीन मिळणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय शासनाचा पटसंख्येअभावी शाळा बंद करून बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे शासकीय षड्यंत्र असून ते हाणून पाडले पाहिजे, असेही ते म्हणाले. एका सहीने येणारे गुंजवणीचे पाणी गेले कुठे, असे आरोप करीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी राज्यमंत्री शिवतारे यांच्यावर टीका केली. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी जिल्ह्यातील एकही शाळा पतसंख्येअभावी बंद पडणार नसल्याची ग्वाही दिली. बाबा जाधवराव यांनी विमानतळाला विरोध करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकºयांच्या बरोबर यावे, असे आवाहन केले.नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी स्वागत केले. ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांनी प्रास्ताविक केले, संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. धनंजय भोईटे यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांची थडगी रचून विकास नको : शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:30 AM