पुणे : पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी पुरवठा करणाऱ्या टँकरना कोणतीही बाधा येऊ नये, याची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर लोणी येथून पेट्रोलचा पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे पेट्रोलचा तुटवडा होण्याची शक्यता नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी स्पष्ट केले.
पेट्रोल व डिझेलची वाहतूक करणारे टँकरचालकही वाहतूकदारांच्या संपात सहभागी असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर शहरातील नागरिकांनी सोमवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपांवर मोठी गर्दी केली होती. पेट्रोल टंचाई असल्याची अफवा पसरल्यानंतर पेट्रोल डिझेल डीलर्स असोसिएशनने मात्र, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करून पुरवठा करणारे टँकर या संपात सहभागी नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही, नागरिकांनी पंपांवर मोठी गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांनी यात हस्तक्षेप करून पेट्रोल-डिझेल टँकरना पोलिस संरक्षण दिले.
ही बाब अत्यावश्यक सेवेत येत असल्याने राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार तातडीने हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांना सर्व संबंधितांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. याबाबत होळकर म्हणाल्या, ‘शहरात तसेच जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सर्व पेट्रोलियम कंपन्या तसेच डीलर्स असोसिएशनशी चर्चा करण्यात आली. संपात टँकरचालक सहभागी नसले तर रस्त्यात त्यांची अडवणूक होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे व पिंपरीचे पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पुरवठा सुरळीत राहण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व तालुक्यांमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच, कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असून कोठेही पेट्रोल, डिझेलचा तुटवडा नाही. लोणी काळभोरहून मंगळवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून पेट्रोल-डिझेल भरून पेट्रोल पंपावर जात आहेत. शहरात तसेच जिल्ह्यात कोणत्याही पंपावर पेट्रोल डिझेलच्या साठ्याबाबत सध्या अडचण नाही. त्यामुळे सध्या तरी पुरवठा सुरळीत सुरू आहे.’