पुणे : अलीकडच्या काळात समाजात जातिभेद वाढला आहे. लोक संतांच्यादेखील जाती पाहायला लागले आहेत. राजकीय चळवळी करण्यासाठी बाहेरील लोक अशा अपप्रवृत्ती पसरवत आहेत. अपप्रवृत्तींना संप्रदायातील लोकांनी बळी पडू नये. संतांची शिकवण ही महाराष्ट्राच्या सामाजिकतेला आधारभूत असे ऐक्य आहे. त्यामुळे हे ऐक्य कोणत्याही राजकीय, सामाजिक, अपप्रवृत्तींमुळे तुटणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. श्री ज्ञानेश्वरी वाचन मंडळ ट्रस्ट व श्री समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या वेळी वारकरी भजनी मालिका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. श्री ज्ञानेश्वरी वाचन मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पानसरे, बाळासाहेब सातपुते, तुकाराम रासने, श्री समस्त नामदेव शिंपी दैव मंडळाचे अध्यक्ष रमेश मेहेर, शाहीर हेमंत मावळे, संदीप लचके, मुकुंद भेलके, अॅड. ज्ञानेश्वर पाटसकर, प्रशांत भोंडवे, अखिल झांजले, सुनील रासने, श्रीकांत कारंजकर, प्रसाद पानसरे, संतोष डापसे या वेळी उपस्थित होते. या वेळी नलूताई कासार यांचा सन्मान करण्यात आला. कृष्णा पानसरे म्हणाले, ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळ्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या सामुदायिक पारायण सोहळ्याची सुरुवात शनिवारवाड्यातील बटाट्या मारुती मंदिरात झाली होती. या पारायण सोहळ्यात खंड पडू न देता रासने परिवाराने ही परंपरा अखंड सुरू ठेवली आहे. त्यामुळे भाविकांना त्याचा आजही लाभ मिळत आहे.’संदीप लचके यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब सातपुते यांनी प्रास्ताविक केले.
वारकरी संप्रदाय हा ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या आधीपासून चालत आलेला संप्रदाय आहे. या संप्रदायाचे आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल आणि त्याची उपासना म्हणजे वारी. कोणत्याही संप्रदायात दैवत आणि दैवताची उपासना या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. संप्रदायाला एक प्रतिष्ठेची ओळख तेव्हा मिळते जेव्हा त्यांच्याकडे स्वत:चा ग्रंथ असतो आणि वारकरी संप्रदायाची ओळख म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे.- डॉ. सदानंद मोरे, संतसाहित्याचे अभ्यासक