नीलेश जंगम, पिंपरीएखादी घटना सुखद असो वा दु:खद; त्यानिमित्त शुभेच्छा अथवा आदरांजली अशा भावना व्यक्त करण्यासाठी सामान्यांकडून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मात्र कायम प्रसिद्धिझोतात राहू इच्छिणाऱ्या काही कार्यकर्त्यांना कशाचेच भान उरत नाही. स्वत:ची छबी ठळकपणे छापण्याचा मोह श्रद्धांजलीपर पत्रकातही आवरता न आल्याची प्रचिती शहिदांच्या स्मृतिदिनी आली. पूर्वी कॅलेंडर, फ्लेक्स किंवा होर्डिंग्जच्या माध्यमातून स्वत:ला झळकावत होते. आता व्हॉट्स अप, फेसबुक अशा माध्यमांतूनसुद्धा झळकण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी वा नैसर्गिक आपत्तीची घटना असो; कोणत्याही निमित्ताने प्रसिद्धीच्या मोहात राहणाऱ्या या कार्यकर्त्याला आपण काय करतोय याचे भानही उरलेले नाही. आज व्हॉट्स अपवरील एका पोस्टवर त्यांनी दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणाच्या छायाचित्रात स्वत:ची छबी वापरली. या पोस्टमध्ये वरच्या भागात त्याने स्वत:च्या संघटनेचेही नाव लिहिले. विशेष म्हणजे या संपूर्ण पोस्टमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांपैकी एकाही जवानाचे छायाचित्र नव्हते. ही पोस्ट पाहूून हल्ल्यात तेच शहीद झालेत, की काय असा संभ्रम होत होता. दरम्यान, संविधान दिनाच्या निमित्ताने काहींनी संविधान प्रस्ताविकेच्या प्रती वाटल्या. त्यांनीही आपले नाव आणि छायाचित्र ठळकपणे दिसेल याची काळजी अवश्य घेतली.
प्रसिद्धीलोलुपांना राहीले नाही भान
By admin | Published: November 27, 2015 1:24 AM