पुणे : आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी विरोधकांना रसद पुरविणाºया नेत्यांविरोधात शनिवार काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून गेलेले नेते, आजी-माजी पदाधिकारी महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पुन्हा पक्षाचे दरवाजे ठोठावत आहेत. त्यांना पक्षाने पुन्हा थारा देऊ नये, तसेच पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीचे ठराव करण्यात आले. ज्येष्ठ पदाधिकारी व नेत्यांविरोधातच कार्यकर्त्यांनी आवाज उठविल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रविवारी काँग्रेस भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत महाविकासाआघाडी तसेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करून आपल्या भावनांना वाट भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक अजित दरेकर, अविनाश बागवे, लता राजगुरू, वैशाली मराठे, रोहित टिळक, संगिता तिवारी, नीता रजपुत, महिला शहराध्यक्ष सोनाली मारणे आदी उपस्थित होते. निवडणुकीदरम्यान पक्ष सोडून गेलेले काहीजण आपल्या काही नेत्यांच्या माध्यमातून पुन्हा पक्षात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशांना पुन्हा पक्षात थारा देऊ नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली. पक्ष सोडून गेलेल्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांनी केले. अशा गद्दारी केलेल्यांची शिफारस प्रदेश काँग्रेसच्या सदस्यत्वासाठी देखील काही स्वकीयांनीच केली. याबाबत वरिष्ठ स्तरावरून कोणतीही कारवाई लवकरात लवकर न झाल्यास अशा गद्दारांचा समाचार कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवनमध्ये घेण्यात येईल, अशा संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्याबाबतचे दोन स्वतंत्र ठराव बैठकीत मंजुर करण्यात आले. यावेळी बोलातना रमेश बागवे म्हणाले, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव व्हावा म्हणून छुप्या पद्धतीने काही लोकांनी पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांना रसद पुरवत आपलाच उमेदवार कसा पराभूत होईल यासाठी धडपड केली. अश्या नेत्यांमुळेच पक्षाची शहरात हानी होत असून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.
............
विरोधकांना पक्षातूनच रसद
विरोधी पक्षाची मोट्ठी फौज मतदारसंघात असताना देखील स्वत: व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे चांगली लढत देऊ शकलो. परंतु पक्ष सोडून गेलेले मतदारसंघातील काही स्वार्थी पदाधिकारी व त्यांना आपल्याच पक्षातून मिळालेले प्रोत्साहन यामुळे थोडक्यात विजय हुकला. कोणीकोणी काय कारस्थाने केली याबाबतचा अहवाल तयार करणार असून लवकरच त्यांच्या नावासह जाहीर करणार असल्याचे दत्ता बहिरट यांनी स्पष्ट केले. तर निवडणुकीत सत्तापदे भोगलेल्या नेत्यांनीच काम केले नाही. केवळ कार्यकर्त्यांनी निवडणुकीत कष्ट घेतले, अशी अरविंद शिंदे यांनी केली.