गद्दारांना आता पक्षात स्थान देऊ नका ; काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रीया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 02:13 PM2019-12-02T14:13:01+5:302019-12-02T14:14:13+5:30
निवडणुकीच्या आधी पक्ष साेडून गेलेल्या पक्षाशी गद्दारी केलेल्या पदाधिकाऱ्यांना, तसेच नेत्यांना पक्षामध्ये पुन्हा स्थान देऊ नये अशा प्रतिक्रीया क्राॅंग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
पुणे : पुणे शहर जिल्हा काॅंग्रेस कमिटीतर्फे काॅंग्रेसभवन येथील बैठकीत आज महाविकासआघाडीच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबराेबर ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली अशा नेत्यांना पुन्हा पक्षात न घेण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला. तसेच गद्दारांना आता पक्षात स्थान देऊ नका अशा संतप्त प्रतिक्रीया देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेसभवन येथील बैठकीत काल महाविकासाआघाडीच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाबरोबरच अजून दोन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक शहरातील काँग्रेसचे नेते, आजी माजी पदाधिकारी काँग्रेस पक्ष सोडून गेले व त्यांना काँग्रेस पक्षाने सर्वकाही पदे देऊनही त्यांनी पक्षाशी जी गद्दारी केली त्याबद्दल बैठकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तसेच आता सत्ता आल्यामुळे पक्ष सोडून गेलेले काही पदाधिकारी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश मिळावा यासाठी काही नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत असून अश्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात अजिबात स्थान देण्यात येऊ नये असे मत व्यक्त करत उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनादेखील त्यांची योग्य ती जागा दाखवावी असे मत व्यक्त केले.
याबाबत वरिष्ठ स्तरावरून कोणतीही कारवाई लवकरात लवकर न झाल्यास अश्या गद्दारांचा कार्यकर्ते भर काँग्रेस भवनमध्ये त्यांच्या पद्धतीने समाचार घेतील असा संतप्त इशारादेखील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. पक्ष सोडून गेलेल्या लोकांना पुन्हा पक्षात न घेण्याचा ठराव शहर काँग्रेस कमिटीतर्फे नगरसेवक अजित दरेकर यांनी मांडला त्यास संगीत तिवारी यांनी अनुमोदन दिले. सदर ठरावाला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार पाठिंबा दर्शवत शहरात काँग्रेसची परिस्थिती सुधारण्यासाठी व पक्ष सोडून गेलेल्यांना अद्दल घडविण्यासाठी या ठरावाची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन अंमलबजावणी केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पक्षाच्या तिन्ही उमेदवारांनी याबाबत मत व्यक्त केले यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले कि, " विधानसभा निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांनी केले. तसेच अश्या गद्दारी केलेल्यांची शिफारस प्रदेश काँग्रेसच्या सदस्यत्वासाठी देखील काही स्वकीयांनीच केली. तसेच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव व्हावा म्हणून छुप्या पद्धतीने काही लोकांनी पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांना रसद पुरवत आपलाच उमेदवार कसा पराभूत होईल यासाठी धडपड केली. अश्या नेत्यांमुळेच पक्षाची शहरात हानी होत असून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे "
पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे म्हणाले की ," फक्त कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार कष्टाच्या जीवावर निवडणुकीत प्रचार झाला. परंतु सत्तापदे भोगलेल्या नेत्यांनी निवडुकीत कोणतेही काम केले नाही". दत्ता बहिरट यांनीदेखील आपले मत व्यक्त करताना सांगितले कि "विरोधी पक्षाची मोट्ठी फौज मतदारसंघात असताना देखील स्वतः व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे चांगली लढत देऊ शकलो. परंतु पक्ष सोडून गेलेले मतदारसंघातील काही स्वार्थी पदाधिकारी व त्यांना आपल्याच पक्षातून मिळालेले प्रोत्साहन यामुळे थोडक्यात विजय हुकला. कोणीकोणी काय काय कारस्थाने केली याबाबतचा अहवाल मी तयार करणार असून लवकरच गद्दारांच्या नावासह तो जाहीर करणार आहे"