पुणे : मेट्रोच्या कामामुळे आणि डीपीमधील रस्त्याने डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्याचे नुकसान होत आहे, ते होऊ दिले जाणार नाही. त्यासाठी पालिका आयुक्त, पर्यावरण अभ्यासक, मेट्रोचे अधिकारी आणि स्थानिक आमदार यांच्यासोबत चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल. अभयारण्याचे नुकसान करू देणार नाही, असे आश्वासन उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिले.अभयारण्य वाचविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य ग्रुपतर्फे बर्ड वॉचिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उपमहापौरांनीदेखील सहभाग घेतला. त्यांनी अभयारण्याची पाहणी करून पक्ष्यांचे निरीक्षणही केले. येथे सुमारे २०० हून अधिक पक्ष्यांच्या विविध प्रजाती आढळून येतात. त्याची आणि तेथील कामाची माहिती वन्यजीव प्राणी संशोधक धर्मराज पाटील यांनी उपमहापौरांना दिली. अभयारण्याची पाहणी झाल्यानंतर कल्याणीनगर येथील रहिवाशांसोबत बैठक झाली. त्यामध्ये मेट्रोबाबत आणि अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्याबाबत धेंडे यांनी माहिती दिली.ते म्हणाले, या दोन्ही कामांमुळे येथील पर्यावरणाचे नुकसान होऊ देणार नाही. हे अभयारण्य जपणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त आणि आमदार जगदीश मुळीक यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.पक्षी अभयारण्य वाचविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कारण अभयारण्यातील पक्षी, झाडे यांना बोलता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यांना कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही. पर्यावरण अभ्यासकांसोबत चर्चा करूनच पुढील कामे सुरू करण्यात येतील.- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर
रस्त्यामुळे अभयारण्याला इजा नाही - डॉ. सिद्धार्थ धेंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 2:11 AM