पुणे - कलाकार कलेच्या प्रेमाखातर आणि स्वत:च्या आनंदासाठी साधना करीत असतात. कलाकारांना महापालिकेकडून सन्मानाची, त्यांच्या कामाची बूज राखली जावी, एवढीच अपेक्षा असते. दिग्गजांच्या नावाचा सन्मान मिळणे, ही कलाकारांसाठी जगण्याची पुंजी असते. त्यांची नजर कधीच पुरस्कार किंवा मानधनाकडे नसते. त्यामुळे महापालिकेने आर्थिक गणितांमुळे सन्मानाशी तडजोड करू नये, अशी विनंती ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांनी पत्राद्वारे केली आहे. हे पत्र लवकरच महापालिकेला देण्यात येईल.सांस्कृतिक महोत्सवांवर होणारी उधळपट्टी रोखण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश काढल्यानंतर पुणे महापालिकेचे पुरस्कार रखडले आहेत. या पुरस्कारांसाठी किमान मानपत्र देण्याची तरतूद करण्यात यावी, नगरसेवकांनी एका महिन्याचे मानधन महापौरांकडे जमा करुन पुरस्कारांची रक्कम उभी करावी, असा प्रस्ताव नगरसेवक आबा बागुल यांनी महापालिकेला दिल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ४ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर, नादरूप संस्थेच्या शमा भाटे यांनी या पत्रातून कलाकारांच्या भावना महापालिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.‘सांस्कृतिक महोत्सवाबाबत होणारी उधळपट्टी रोखण्याचा राज्य शासनाने दिलेला आदेश आणि त्यामुळे रखडलेले पुरस्कार, ही बाब कोणत्याही कलाकारासाठी वेदनादायी आहे. ज्यांचा जगाने गौरव करावा, अशा भारतरत्न पं. भीमसेन जोशी, गुरु रोहिणी भाटे, पठ्ठे बापूराव अशा भविष्यात काम करीत राहण्यासाठी मिळणारी प्रेरणा असते. महापालिकेच्या पुरस्कारातून ‘भारतरत्न’ मिळाल्याच आनंद आणि समाधान देतो. पुरस्काराइतकेच मानपत्रालाही महत्त्व आहे. त्यामुळे आबा बागुल तसेच पुणे महापालिकेबाबत कलाकार कायमच कृतज्ञराहतील. मात्र, कलाकारांसाठी मानधनापेक्षा सन्मान जास्त महत्त्वाचा असतो. पुणे शहराला तसेच पुण्यातील कलाकारांना मिळणाऱ्या सन्मानाची आर्थिक गणितामुळे तडजोड केली जाऊ नये,’ असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.महापालिकेने गांभीर्याने विचार करावायाबाबत ‘लोकमत’शी बोलताना शमा भाटे म्हणाल्या, ‘पं. गुरू रोहिणीताई भाटे यांच्या नावाने पुरस्कार सुरू व्हावा, यासाठी आबा बागुल यांच्याशी चर्चा करताना कलाकारांनी मानधनाची कधी विचारणाही केली नाही, आग्रह धरला नाही. परंतु, आपले वास्तव्य असणाºया शहरातून, आपल्याच महापालिकेकडून नामवंत कलाकारांच्या नावाने आपल्या कार्याचा सन्मान व्हावा, ही गोष्ट कोणत्याही कलाकाराला निश्चितपणे हवीहवीशी वाटते. त्यामुळे महापालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करावा.’’
मानधन नको, सन्मान हवा, शमा भाटेंचे महापालिकेला पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 3:46 AM