पुणे : पुण्यासह सोलापुर जिल्ह्यातील काही तालुक्यांत अजूनही समाधानकार पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर आणि शिरुर या तालुक्यांसह सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असा सल्ला भारतीय हवामान विभागाच्या कृषी हवामान प्रभागाने दिला आहे. पुणे, सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यासाठी पुण्याच्या प्रादेशिक हवामान केंद्राने कृषी सल्ला दिला आहे. या जिल्ह्यातील पेरणी योग्य पाऊस झालेल्या ठिकाणी सोयाबीन, तूर, उडीद, भुईमूग, मका या पिकांच्या सुधारित वाणांच्या पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, शिरुर, सोलापूरमधील जेऊर, माळशिरस, सांगोला, जळगावमधील मुक्ताईनगर, रावेर, यावल या तालुक्यांत पेरणीची घाई करु नये, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. बाजरीच्या पेरणीसाठी स्थानिक वाणाऐवजी सुधारित अथवा संकरीत वाणांचे बियाणे हेक्टरी ३ ते ४ किलो या प्रमाणात पेरणीसाठी वापरावे. तसेच गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी मेटेलॅक्झील ३५ डब्लूएस हे प्रतिकिलो ग्रॅमला सहा ग्रॅम चोळावे त्यानंतरच बीजप्रक्रिया करावी. या नंतर एॅझोस्पिरिलम व पीएसबी हे जीवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात गुळाच्या द्रावणात (अडीचशे ग्रॅम गूळ १ लिटर पाण्यात मिसळून) एकत्र करुन बियाण्यास चोळावे. त्यानंतर ते सुकवून ४ ते ५ तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे.
पेरणीची घाई करु नका : कृषी विभागाचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 8:49 PM
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असा सल्ला भारतीय हवामान विभागाच्या कृषी हवामान प्रभागाने दिला आहे.
ठळक मुद्देयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी सोयाबीन, तूर, उडीद, भुईमूग, मका या पिकांच्या सुधारित वाणांच्या पेरणी करण्याचा सल्ला