पुणे : ‘तबला’ हे साथीचे वाद्य राहिलेले नसून, आज एकल वाद्य म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे गायन किंवा नृत्याबरोबर केवळ संगतीचे वाद्य म्हणून तबल्याला सीमित ठेवू न देता त्याच्या पलीकडे जाऊन युवा पिढीने तबल्याची ओळख निर्माण केली पाहिजे, असा सल्ला देत, तबलावादनातील कौशल्य आणि स्वतंत्र वादनामुळेच पुरस्काराचेदेखील दावेदार बनलो असल्याची भावना ज्येष्ठ तबलावादक पं. स्वपन चौधरी यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘तालचक्र’ महोत्सवात पं. स्वपन चौधरी यांना गाडगीळ अँड सन्सचे अभय गाडगीळ यांच्या हस्ते ‘तालरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. १ लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी ज्येष्ठ घटम्वादक विक्कू विनायकराम यांचे चिरंजीव सेल्वा गणेश, पं. विजय घाटे, हेमंत अभ्यंकर, शरद घोलप उपस्थित होते. सुरुवातीला पं. स्वपन चौधरी यांच्या तबल्याचा ठेका... आणि त्यातून उमटणाऱ्या ‘नादमाधुर्या’चा आविष्कार रसिकांनी अनुभवला. लखनौ शैलीच्या तालाचे सौंदर्य त्यांनी रसिकांसमोर उलगडले. तालवाद्य आणि सूरवाद्य यांमध्ये भेद न करणाऱ्या पंडितजींच्या साथीला असलेल्या दिलशात खाँ यांच्या कारुण्य रसातील सारंगीवादनाने अद्वितीय आविष्काराची अनुभूती रसिकांना दिली. तीन तालाने प्रारंभ करीत पलटा ठेका, कायदा रेला आणि गत त्यांनी पेश केली. आपल्या वादनाच्या रचनेचे वैशिष्ट्य आणि अमीर हुसेन खाँ यांच्यासारख्या कलाकाराचा मोठेपणा विशद करीत विनम्रतेची प्रचिती ते लोकांना देत होते. कार्यक्रमाचा उत्तरार्ध स्विडीश फोक बँंड मिका यांच्या सादरीकरणाने रंगला. विक्कू विनायकराम यांचे सुपुत्र सेल्वा गणेश आणि नातू स्वामीनाथन यांच्या वादनाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. (प्रतिनिधी)