पुणे : क्लासला जातो म्हणून गेलेला १४ वर्षांचा मुलगा परतला नाही. त्यानंतर वडिलांच्या मोबाईलवर थेट ‘तुम्हारा बेटा चाहिये तो विशाखापट्टणम आ’ असा मेसेज आला. कुटुंबीयांसह पोलिसांची एकच धांदल उडाली. मात्र त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी विशाखापट्टणम पोलिसांशी संपर्क करून केलेल्या तपासात वडिलांनी क्रिकेटचा क्लास न लावल्याने मुलानेच थेट विशाखापट्टणम गाठून स्वत:च्या अपहरणाचा डाव रचल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीत राहणाऱ्या एका पालकाला १ जानेवारी रोजी त्यांच्या १४ वर्षांच्या मुलाच्या मोबाईलवरुन ‘अगर तुम्हारा बेटा चाहिये तो विशाखापट्टणम आ’असा इंग्रजीत मेसेज आला़ त्यांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार सहकारनगर पोलिसांकडे दिली़ पोलिसांनी विशाखापट्टणम पोलिसांशी संपर्क साधून मुलाचे फोटो व माहिती पाठवली. पोलीस उपनिरीक्षक शिलेदार, पोलीस नाईक मरगजे, इंगळे यांना विशाखापट्टणमकडे रवाना केले. ते विजयावाडा येथे असताना विशाखापट्टणम येथील पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार यांच्या पथकाला एक मुलगा रेल्वे स्टेशनवर मिळाला. त्यांनी मुलावर लक्ष ठेवले. तेव्हा त्याचे अपहरण केले नसल्याचे आढळून आले. त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारणा केल्यावर वडिलांनी क्रिकेट अॅकॅडमी लावली नाही म्हणून क्लासला जातो म्हणून सांगून बॅग व आईचा मोबाईल घेऊन तो बाहेर पडला. बालाजीनगर येथील बसस्टॉपवरून पुणे स्टेशनला गेला आणि रेल्वेने विशाखापट्टणम येथे गेला. रस्त्यात त्याला भीती वाटली म्हणून वडिलांच्या मोबाईलवर अपहरण झाल्याचा मेसेज केला.