पुणे : वर्षाच्या सुरुवातीपासून शहरात माेठ्याप्रमाणावर हेल्मेट न घालणाऱ्यांवर पुणे वाहतूक पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. या विराेधात अनेक संघटना, राजकीय पक्षांनी आंदाेलने केली. परंतु पाेलिसांकडून कारवाई सुरुच हाेती. या संदर्भात शहरीभागात जेथे वाहनांचा वेग कमी असताे अशा ठिकाणी हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये अशी विनंती आमदार माधुरी मिसाळ , विजय काळे, जगदीश मुळीक, याेगेश टिळेकर यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेत केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या पाेलीस आयुक्तांना फाेन करुन शहरी भागात हेल्मेट सक्तीची कारवाई करु नये अशी सूचना केली असल्याचा दावा आमदार माधुरी मिसाळ यांनी केला आहे.
जानेवारीपासून हेल्मेट न घालणाऱ्यांच्या विराेधात पाेलीस जाेरदार कारवाई करत आहेत. शहरातील विविध चाैकांमध्ये पाेलीस हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. एप्रिलपर्यंत साडेसात लाख पुणेकरांवर हेल्मेटसक्तीची कारवाई करण्यात आली हाेती. त्यांच्याकडून कराेडाे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला हाेता. शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे वाहनांचा वेग कमी असल्याने शहरी भागात हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी विविध सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून करण्यात आली हाेती. परंतु सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत वाहतूक पाेलीस हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करत हाेते. यामुळे पुणेकरांमध्ये नाराजी हाेती. या प्रश्नावर आज पुण्यातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. त्यात शहरीभागात हेल्मेट सक्तीची कारवाई करु नये असा आदेश मुख्यमंत्र्यांनी पाेलीस आयुक्तांना फाेन करुन दिला असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.
याबाबात अधिक माहिती देताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरिता वाहन चालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत व दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. हेच लक्षात घेत आज आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व या प्रश्नाला वाचा फोडली. याबरोबरच विनाहेल्मेट वाहन चालकांच्या वर पोलिस करित असलेली दंडात्मक कारवाई, परवाना ताब्यात घेणे व पोलिसांची अरेरावी याबाबत भूमिका देखील मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांना पुण्यात शहरी व नागरी भागात हेल्मेट सक्ती स्थगित करण्याबाबतची आमची विनंती मान्य करीत पुणे पोलीस आयुक्तांना तात्काळ तशा सूचना दिल्या आहेत. यामुळे शहरी भागात हेल्मेटच्या प्रश्नाबाबत पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.