१ एप्रिलपासून कोणत्याही राजकीय,सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करू नका; अजित पवारांची लोकप्रतिनिधींना तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 09:02 PM2021-03-26T21:02:56+5:302021-03-26T21:03:37+5:30
कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वच राजकीय नेत्यांनी लग्न सोहळ्यांना देखील उपस्थित राहण्याचे टाळावे, असे देखील अजित पवारांनी यावेळी म्हणाले.
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमका पुण्यात लॉक डाऊन जाहीर करणार की कडक निर्बंध लादणार या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.मात्र तूर्तास तरी पुणेकरांवरचा लॉकडाऊन टळला आहे.पण याचवेळी पवारांनी पुणेकरांसह राजकीय नेत्यांना देखील चांगलीच तंबी दिली आहे.
पुण्यात शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी वाढती रुग्णसंख्या आणि लॉकडाऊन निर्णयावर भाष्य करतानाच नागरिकांसह राजकीय नेत्यांना देखील कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नियमांचे कटाक्षाने पालन करण्याची सूचना केली आहे. या आढावा बैठकीला लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पुणे, पिंपरी चिंचवडचे महापौर, जिल्हाधिकारी, दोन्ही महापालिका आयुक्त,पोलिस आयुक्त उपस्थित होते.
पवार म्हणाले, सध्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीणमधील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच १ एप्रिलपासून सर्वच लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचे उद्घाटन, भूमिपूजन, सभा, यांसह सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. तसेच कोणत्याही लग्न किंवा इतर समारंभाला देखील उपस्थित राहू नये.
पवार म्हणाले, लग्न लॉनमध्ये करा किंवा आणखी कुठे संख्या ५० पेक्षा जास्त असता कामा नये. अंत्यविधीला २० पेक्षा जास्त लोक नकोत. कोरोना रुग्णांची संख्या मागील वेळेपेक्षा वाढली आहे. रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरू होणार आहे. नियमांचे पालन केले नाही, आणि अशीच रुग्णसंख्या वाढ कायम राहिली तर २ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.
लग्न सोडून इतर समारंभ पूर्ण बंद करावेत. उद्यान, बाग बगीचे सकाळीच सुरू राहणार. मॉल, मार्केट, चित्रपट गृह ५० टक्के उपस्थितीमध्ये सुरु ठेवण्यात येतील. सार्वजनिक वाहतूक सुरूच ठेवणार, ऑक्सिजन प्लँट चाकण जवळ झालाय त्यामुळे पुरवठा सुरळीत, कमी पडला तर राजगडमध्ये बोलून ठेवत आहोत. पुणे शहराच्या जम्बो केंद्रातील बेड पूर्ण क्षमतेने सुरू करणार, पिंपरी चिंचवडमधील जम्बो १ एप्रिलपासून पूर्ण वापरत आणणार, ससून ३०० ऐवजी ५०० कोविड बेड करणार असल्याचे सांगताना अजित पवारांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ब्रेक करायचे असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असे म्हटल्याने लॉकडाऊनचा विचार होत असल्याचे सुतोवाच दिले आहेत.