लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे, म्हणून पालकांनी घाबरून जाऊ नये़ आधीच कोरोनामुळे शाळा बंद व कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आपण मुलांना घरात दोन-तीन महिने डांबून ठेवले आहे़ अशावेळी त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचाही विचार करणे जरूरी आहे़ घराबाहेर कुटुंबाव्यतिरिक्त अन्य लोक नाहीत, अशावेळी त्यांना घराबाहेर पडू द्या, खेळ खेळू द्या असा मतप्रवाह शहरातील काही बालरोगतज्ज्ञांनी मांडला आहे़
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बालरोग तज्ज्ञांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती़ या वेळी शहरातील ५३ बालरोगतज्ज्ञ सहभागी झाले होते़ सदर बैठकीस महापौरांसह उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते़ तर, डॉ. संजय नातू, डॉ़ वैद्य, डॉ़ किणीकर, डॉ़ संजय ललवाणी आदींनी या चर्चेत सहभाग घेतला़
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे असे सांगितले जात आहे़ त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणे जरूरी आहे़ मात्र, लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण हे आत्तापर्यंत ०़२ टक्के इतकेच राहिले आहे़ तर, जगात कोरोनामुळे लहान मुलाचा मृत्यू झाला असे प्रमाण नगण्य अथवा नसल्याप्रमाणेच आहे़ अशावेळी अनावश्यक भीती पालकांनी घेता कामा योग्य नसून, मुलांचे मानसिक स्वास्थ चांगले राहील, याकडे लक्ष दिले पाहिजे़
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने एनआयसीयूचे बेड आपण तयार करण्याबरोबरच त्याचा डॅशबोर्डही तयार केला पाहिजे़ याचबरोबर कम्युनिटी वॉरियर्सव्दारे जनजागृती करून, मुलांचे नियमित असलेले लसीकरण थांबणार नाही याकडेही लक्ष देणे जरूरी असल्याचे डॉक्टरांनी आवर्जुन सांगितले़ दरम्यान, लहान मुलांच्या बाबतीत लवकर निदान झाले, तर उपचार योग्य दिशेने करणे सहज शक्य आहे. लहान मुलांना मोठ्या व्यक्तींकडूनच संसर्गाचा धोका असू शकतो, त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील डॉक्टरांकडून करण्यात आले़
-----------------------