पुणे : आज सन्मानाने दिलेली शाल, फेटा, पागोटे आणि पगडी आहे. ते मुळीच काढणार नाही. हा खूप मोठा सन्मान आहे अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘पुणेरी पगडी’ वरून उदभवलेल्या वादावरून अप्रत्यक्षपणे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना टोला लगावला. संगीत रंगभूमीवरील बालगंधर्वांसारख्या मोठ्या कलाकाराच्या नावाने मिळालेला पुरस्कार आणि ज्या वास्तूला त्यांचे नाव दिले आहे, त्या रंगमंचावर काम करण्याची मिळालेली संधी या आनंदाच्या क्षणाने खूप हळवा झालो आहे..आवाज बसल्याने या चोवीस फूटाच्या पवित्र भूमीत पुन्हा येऊ शकणार नाही..याचीच खंत वाटते असे सांगताना गोखले गहिवरले. बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये नाट्य-चित्रपटसृष्टीतील सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, नाटककार-पटकथालेखक अभिराम भडकमकर, बालगंधर्व परिवारचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अमर परदेशी आणि बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक प्रकाश अमराळे उपस्थित होते.गोखले म्हणालो, गोवा नाटक कंपनीसाठी काम करत असताना नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर अनेकदा समुद्र किना-यावर एकटाच जायचो. तो उसळलेला समुद्र पाहून या समुद्राने आता आपल्या कवेत घ्यावे असे वाटायचे. तसेच या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रात्रीचा प्रयोग झाल्यावर एक अंधार पसरतो. केवळ एकच दिवा लागलेला असतो. त्या दिव्याखाली बसून मी नाट्यगृहातील समोरचा अंधार बघतो. त्या अंधाराशी बोलावसं वाटते आणि त्या अंधाराने आपल्या कुशीत सामावून घ्यावे अशी हळवी भावना गोखले यांनी व्यक्त करताच सभागृह नि:शब्द झाले. आवाजाने साथ सोडल्याने १० जानेवारी २०१६ रोजी रंगमंचावरून एक्झिट जाहीर केली. आता पुन्हा रंगमंचावर येणे होणार नसले तरी अभिराम भडकमकर याने एक सुंदर स्क्रिप्ट लिहिले आहे. सध्याच्या डिजिटल युगात संवादापासून दूर गेलो आहोत खूप अप्रतिम कथा आहे. त्या विषयावरच्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार असल्याची घोषणा गोखले यांनी केली. बालगंधर्व या नावाशी सुबोध भावे याच्यामुळे माझे नाते जडले. ‘बालगंधर्व’ चित्रपट करून ते सारे मोकळे झाले असले तरी बालगंधर्व या सुरेख, मनोहारी आणि सखोल अशा निबिड अरण्यातच मी अडकून पडलो, असे भडकमकर यांनी सांगितले. बालगंधर्व हा विषय एका चित्रपटात मावणारा नाही या भावनेतून ‘असा बालगंधर्व’ या कादंबरीचे लेखन झाले. त्याच्या हिंदी अनुवादाचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विट्ठल जाधव, प्रवचनकार तुळशीराम बुरटे, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, अमोल पावनगडकर, डॉ. श्रीमंत पाटील, जादूगार विजय रघुवीर आणि जितेंद्र रघुवीर, ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री तारे, अभिनेते दीपक रेगे, चिन्मय जोगळेकर यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. उल्हास पवार यांनीही रंगभूमीवरच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोरडिया आणि पराग यांनी केले.
सन्मानाने दिलेले फेटा, पागोटे आणि पगडी काढणार नाही : विक्रम गोखले यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 5:22 PM
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमातून पुणेरी पगडी हद्दपार करण्याची घोषणा केली होती....
ठळक मुद्देचित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार असल्याची विक्रम गोखले यांची घोषणा