लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या आठवड्याभारत पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसत आहे. यामुळे घाबरण्याची गरज नसली तरी कोरोना रुग्णांची वाढ अशीच कायम राहिली तर पुन्हा ‘लॉकडाऊन’सारखा कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यामुळे मास्क, सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, स्वच्छता आदी नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याशी या संदर्भात ‘लोकमत’ने संवाद साधला. “जुन-जुलै महिन्यात पुण्यात पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
सध्याच्या कोरोना वाढीची नेमकी कारणे काय आहेत हे सांगताना डॉ. केळकर म्हणाले, “परदेशात निर्बंध उठवले. थंडी वाढली आणि पुन्हा कोरोना आला. आता पुन्हा लॅाकडाउन करण्याची वेळ आली. आपल्याकडे हा आलेख हळुहळु वाढतो आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुण्यात १४० पासून वाढून काल तीनशेच्या वर पोहोचली आहे. ही ‘सेकंड वेव्ह’ नाही. पण ही स्थिती आपल्याला दोन ‘वाॅर्निंग’ देत आहे. ते म्हणजे कोरोना गेलेला नाही. पण जणू कोरोना नाहीसाच झालाय असा महोत्सव, गर्दी आपल्याकडे सुरु झालेली दिसते. पुणेकर भान दाखवणार की नाही हा प्रश्न निर्माण होतो. जोपर्यंत लस नाही तोपर्यंत सतर्कता आवश्यक आहे.”
“लोकांनी सतर्कता पाळली तर एवढ्यात लॅाकडाउन पाळण्याची आवश्यकता पडणार नाही,” असे डॉ. केळकर म्हणाले. मात्र ‘हर्ड इम्युनिटी’चा दावा फसवा आहे. जो आजार आपल्याला माहित नाही त्याबद्दल सावध पवित्रा घ्यावा. महापालिकेने ‘टेस्टींग’ वाढवावे. कोरोना हा आपल्या सोबत राहणार आहे हे लक्षात घेवूनच वागण्याची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
उपचार दोनच रुग्णालयात?
सध्या पुण्यात फक्त दोनच दवाखान्यात कोरोनाचे उपचार केले जात असल्याचा दावा डॉ. धनंजय केळकर यांनी केला. ते म्हणाले की प्रत्येक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणे आवश्यक आहे. कोरोनाची जर काही लक्षणे दिसली तर तातडीने डाॅक्टरांकडे जाण्याची आवश्यकता आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार संबंधितांनी तातडीने विलगीकरणात राहावे.