पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात एक बेवारस व्यक्ती अत्यवस्थ स्थितीत पडून होती. स्थानकावरील डॉक्टर, रेल्वे प्रशासन व पोलिसांना काहींनी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी विनवणी केली. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आवारातच या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याची अवहेलना थांबली नाही. तीन-चार तासांनंतर ‘जीआरपी’ने हा मृतदेह तिथून हलविल्याची माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी दिली.
रेल्वे स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे स्थानक परिसरात दिवस-रात्र नेहमीच वर्दळ असते. अनेक प्रवासी रात्रीच्या वेळी आवारातच थांबतात. काही भिक्षेकरी, मानसिक रुग्ण, मद्यपींचा वावरही स्थानक परिसरात असतो. काही वेळा अन्न-पाण्याविना शारीरिकदृष्ट्या जरजर झालेल्या काही व्यक्तींना ससून रुग्णालयात दाखल केले जात. तर काहींचा परिसरातच मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) मृतदेह किंवा जखमी व्यक्तींना रुग्णालयात पोहचविण्याची जबाबदारी असते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून त्यांना निधीही उपलब्ध करून दिला जातो.
शनिवारी रेल्वे स्थानक परिसरात प्रवेशद्वार क्रमांक तीनजवळ एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह बराच वेळ पडला होता. हर्षा शहा यांनी ही व्यक्ती निपचित पडल्याचे पाहिल्यानंतर तातडीने स्थानकातील वैद्यकीय कक्षात जाऊन मदतीची विनंती केली. पण त्यांच्याकडून बाहेर येण्यास नकार देण्यात आला. बराच वेळ विनवनी केल्यानंतर डॉक्टर तिथपर्यंत आले. मात्र, त्यांनी त्या व्यक्तीला तपासण्यास नकार दिला. आम्ही केवळ स्थानकातील रुग्णांची तपासणी करत असल्याचे कारण त्यांनी दिले.स्थानकातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनीही नकार दिला. रेल्वे प्रशासन, ‘जीआरपी’लाही याची कल्पना दिली. पण कुणीच तातडीने याची दखल घेतली नाही. तब्बल तीन-चार तास सतत धावपळ केल्यानंतर ‘जीआरपी’च्या वाहतूक विभागाने मृतदेह तिथून उचलून नेल्याचे शहा यांनी सांगितले. याबाबत ‘जीआरपी’शी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.‘जीआरपी’कडे बोट४रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत विचारले असता त्यांनी ‘जीआरपी’कडे बोट दाखविले. रेल्वेच्या आवारात अपघात, मृत्यूच्या घटनांची जबाबदारी ‘जीआरपी’कडे आहे. त्यांच्याकडूनच ही प्रकरणे हाताळली जातात. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे कसलीही माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार रेल्वे स्थानकात घडला. डॉक्टरांसह जीआरपी व रेल्वे प्रशासनाकडूनही हाच अनुभव आला. जिवंतपणी नरकयातना सहन कराव्या लागलेल्या व्यक्तीला मृत्यूनंतरही अशाच यातना भोगाव्या लागतात. तीन-चार तास मागे लागल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला. मागील काही दिवसांपासून हा व्यक्ती इथे होता. रेल्वेच्या कर्मचाºयांसह इतर प्रवासी व नागरिकांनी आधीच त्याला रुग्णालयात हलविले असते तर कदाचित वाचला असता.- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी गु्रप