पुणे : वाहतूक पोलिसांना टार्गेट देऊन रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची पद्धत चुकीची असून, लक्ष्याधारित कारवाई त्वरित थांबविण्याचे आदेश पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिले़ रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाने रामानंद यांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थिती दाखवून दिल्यानंतर त्यांनी हा आदेश दिला़ याबाबत रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी सांगितले, की गेले जवळपास महिनाभर अॅटो रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम वाहतूक पोलिसांकडून चालू आहे. काही रिक्षाचालकांकडून प्रवाश्यांना दिला जाणारा नकार हा नोंद घ्यावी इतक्या प्रमाणात येणारा अनुभव आहे. नकार देऊ नये, याबाबत संघटना म्हणून पंचायत सातत्याने विविध प्रयत्न करीत असते़ पोलिसांकडून सध्या सुरू असलेली कारवाई म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम, असा अनुभव देणारी होत आहे. तशा तक्रारी काही जबाबदार रिक्षाचालकांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्याविषयीचे अनुभव दिवाळीच्या तोंडावर पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांच्यापुढे शिष्टमंडळाने मांडले़ ही चुकीची पद्धत असून, अशी लक्ष्याधारित कारवाई थांबविण्याच्या आदेशाच्या सूचना दिल्या. रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांच्यासह शिष्टमंडळात शैलेश गाडे, रावसाहेब कदम, महेंद्र सतुर, अब्दुल सतार, सिद्धार्थ चव्हाण यांचा समावेश होता.वाहतूक पोलिसांना कारवाईच्या संख्येचे लक्ष्य दिले जाते. ते पूर्ण करण्यासाठी खऱ्याबरोबरच खोट्या कारवाया करून लक्ष्य पूर्ण केले जाते, असा रिक्षाचालकांचा आरोप. पोलीस सहआयुक्त रामानंद यांच्या लक्षात आणून देण्यात आल्यानंतर अशी लक्ष्याधारीत कारवाई त्वरित थांबविण्याचे आदेश त्यांनी दिले.ऐन दिवाळीत नियमाने प्रवासी नेणाऱ्या रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिक्षाचालकांसह दुचाकीचालकांनाही अशाच लक्ष्याधारित कारवाईचा सामना करावा लागत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कारवाई करू नका
By admin | Published: November 10, 2015 1:43 AM