पुणे : भगवान महावीरांनी आपल्या जीवनाद्वारे संस्कार, मानवी मूल्ये आणि निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश दिला आहे. ‘जगा आणि जगू द्या’ या मुख्य संदेशाद्वारेच विश्वशांती निर्माण होऊ शकते. मुलांना सुसंस्कारित करण्याची आवश्यकता आहे. मूल्यांचा ऱ्हास झाल्यास आपले जीवनच बरबाद होईल. आपल्या स्वार्थासाठी निसर्गाबरोबर छेडछाड कराल, तर संपूर्ण मानवजातीलाच मोठा धोका निर्माण होईल. कोविड महामारी हा याचाच परिणाम आहे असे प्रतिपादन ‘लोकमत समूहा’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार आणि सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी रविवारी केले.
भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणकनिमित्त महावीर इंटरनॅशनलच्या नाशिक शाखेद्वारे ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात, विजय दर्डा हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ‘महावीरांचे सिद्धांत आणि विज्ञानाचे महत्त्व’ हा व्याख्यानाचा विषय होता. ते म्हणाले,“भावी पिढी सुसंस्कारित होईल अशा पद्धतीने साधूसंतांनी भगवान महावीर यांच्या विचारांचा प्रचार करावा. जेव्हा मानव एखाद्या क्षेत्रावर अतिक्रमण करतो, दुसऱ्याच्या अस्तित्वावरच कब्जा करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तणाव निर्माण होतो. त्याचा विपरित परिणाम हा मानवावर होतो. निसर्गाबरोबर छेडछाड केल्याचा दुष्परिणाम आपण कोविड महामारीच्या रुपाने अनुभवत आहोत. भगवान महावीरांची शिकवण आम जनतेपर्यंत पोहोचविण्यात साधूसंत यशस्वी झाल्यास सकल जैन समाज हा मजबूत होईल. दया, करुणा, प्रेम आणि वात्सल्याची भावना ते प्रत्येकामध्ये निर्माण करू शकतात.”
वाणीभूषण प्रीतिसुधाजी महाराज यांच्या १९९४ सालच्या नागपूर येथील चातुर्मासाच्या आठवणी सांगतानाच त्यांनी साध्वीजी या भगवतीस्वरुपा आहेत, असे नमूद केले. या कार्यक्रमात वाणीभूषण प्रीतिसुधाजी महाराज, क्रांतिकारी मधुस्मिताजी महाराज, मंगलप्रभाजी महाराज आदी साध्वीजी उपस्थित होत्या. नवकार महामंत्र आणि महावीरांना वंदन करून कार्यक्रमाचा प्रारंभ, तर मंगलपाठाने समाप्ती झाली. संस्थेच्या महिलाप्रमुख डाॅ. संगीता बाफना यांनी सूत्रसंचालन केले. तर नाशिक शाखेचे अध्यक्ष अनिल नाहर, सचिव राजेंद्र बाफना यांनी संयोजन केले. ललीत सुराणा यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.
भगवंतांचे सिद्धांत आत्मसात करा : छाजेड
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केले. ते म्हणाले, ‘‘आज सर्वत्र भयावह वातावरण आहे. आम्ही अज्ञात शत्रूविरुद्ध लढाई लढत आहोत. २५०० वर्षांपूर्वी महावीरांनी आम्हाला जे तत्त्वज्ञान सांगितले त्या माध्यमातून ही लढाई आपण जिंकू शकतो. आपले आचार आणि विचार कसे असावेत, याचा संदेश भगवंतांनी आपल्याला दिला आहे. त्यानुसार आपल्याला चालायचे आहे. त्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ हे तत्त्व आत्मसात करा.”