लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : कोरोनावर रेमडेसिविर हे इंजेक्शन अंतिम उपाय नाही व या इंजेक्शनमुळे हा रोग बरा होईल असेही नाही. रेमडेसिविरचे काही साईडईफेक्ट आहेत. हे इंजेक्शन कोणाला दिले पाहिजे व कोणाला नाही याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली मते मांडली आहेत. ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. डॉक्टरांनी गरज नसताना या इंजेक्शनचा वापर करू नका असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मांडले.
मंचर येथे कोविड उपाययोजनांसंदर्भात जिल्हास्तरीय अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक रविवारी झाली. या बैठकीस शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे उपस्थित होते. या वेळी विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, सुनील बाणखेले, राजाराम बाणखेले अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर संदर्भात तक्रारी व सूचना मांडल्या. डॉक्टरांनी सांगितल्याबरोबर नातेवाईक रेमडेसिविरची शोधाशोध सुरू करतात. याबाबत सतत फोन करून पाठपुरावा करत असतात.
डॉक्टर सुध्दा रेमडेसिविर असेल तरच रुग्णाला अॅडमिट करून घेतले जाईल, नाही तर इतर कुठेही घेऊन जा असे सांगून रुग्णाला प्रवेश नाकारतात. एचआरसीटी अहवालात सात ते आठ स्कोर आला, तरी रेमडेसिविर आणा असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे नातेवाईकांची ओढाताण होते असे मत विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, सुनील बाणखेले, राजाराम बाणखेले यांनी मांडले. याबाबत प्रशासनाची भूमिका काय व नेमके काय केले पाहिजे, याबाबत जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांना स्पष्टीकरण द्यावे असे वळसे पाटील यांनी सांगितले. यावर डॉ. अशोक नांदापूरकर म्हणाले की, कोरोना मध्ये डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडे रेमडेसिविर इंजेक्शन आणून द्या म्हणून चिठ्ठी हातात देवू नका. यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर कमिटी असून आता थेट रुग्णालयाला इंजेक्शन पुरवठा होत आहे. रेमडेसिविर हे जीव वाचवणारे इंजेक्शन नाही, तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून द्यावयाचे इंजेक्शन आहे. डॉक्टरांनी गरज नसताना या इंजेक्शनचा वापर करू नका, असे आढळल्यास त्या रुग्णालयावर कारवाई होऊ शकते, असे वळसे पाटील म्हणाले.
चौकट
राज्यात रेमडेसिविर व ऑक्सिजनचा वापर हा पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. यावर नियंत्रण आणले पाहिजे. गरज नसताना रेमडेसिविर व ऑक्सिजन देऊ नका अशा सूचना सरकारी व खासगी डॉक्टरांना वेळोवेळी दिल्या आहे. तसेच डॉक्टरांनी परस्पर रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर व ऑक्सिजन बाबत कळवू नका, प्रत्येक रुग्णालयाला दिलेल्या लॉगईनवर माहिती भरा, गरजे नुसार याचा पुरवठा थेट रूग्णालयाला केला जाईल असे असतानाही काही रुग्णालये नातेवाईकांना रेमडेसिविर व ऑक्सिजन आणण्याबाबत सांगतात हे चुकीचे आहे असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.