पुणे : ‘स्वयम्’ उपग्रह बनवून इतिहास रचणाऱ्या पुण्यातील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालेवाडी येथे भेट घेतली. ‘तुम्ही खूप चांगले काम केले आहे. असेच चांगले काम करीत राहा,’ अशा शब्दांत मोदी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. या वेळी विद्यार्थ्यांनी त्यांना स्वयम्ची प्रतिकृती भेट दिली.पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित दौऱ्यात विद्यार्थ्यांच्या भेटीचा कार्यक्रम नव्हता. मात्र, शनिवारी दुपारी बालेवाडी येथील कार्यक्रमाच्या काही तास आधी मोदी यांच्या सचिवांनी सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांच्याशी संपर्क साधून पंतप्रधान विद्यार्थ्यांना भेटणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संपूर्ण ‘स्वयम्’ टीम आनंदून गेली होती. एकूण ४७ विद्यार्थी, डॉ. आहुजा, डॉ. मनीषा खळदकर यांच्यासह संस्थेच्या नियामक मंडळाचे काही सदस्य दुपारी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. मोदी तिथे आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. काही विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करीत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘तुम्ही खूप चांगले काम केले आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा, यापुढेही असेच चांगले काम करीत राहा,’ अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. याविषयी माहिती देताना डॉ. आहुजा म्हणाले, ‘‘मोदी यांच्या भेटीने सर्वच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मोदींना ‘स्वयम्’ उपग्रहाची सर्व माहिती असल्याचे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जाणवले. विद्यार्थ्यांनी त्यांना ‘स्वयम्’ उपग्रहाची प्रतिकृती भेट म्हणून दिली. मोदी यांनी विद्यार्थ्यांसोबत छायाचित्रही काढले.‘मेक युवर सिटी स्मार्ट’ स्पर्धेची घोषणास्मार्ट सिटी योजनेची वर्षपूर्ती होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक युवर सिटी स्मार्ट’ या देशव्यापी स्पर्धेची महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्याचबरोबर देशातील ९८ स्मार्ट सिटींचे प्रोजेक्ट, अमृत योजना, स्वच्छ भारत योजना आदींची एकत्रित माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मेक युवर सिटी स्मार्ट’ ही स्पर्धा व्यक्तिगत, समुह व तज्ज्ञ व्यक्ति या तिघांसाठी खुली राहणार आहे. एखादा रस्ता किंवा एरिया कशा पध्दतीने विकसित करता येईल याचे प्रस्ताव सादर करता येणार आहेत.
असेच काम करा
By admin | Published: June 26, 2016 4:51 AM