पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या पायरीमार्गाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजूरी दिली असून हा प्रस्ताव राष्ट्रीय वन्य जीव मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच सध्या अस्तित्वातील पायरी ते कोंडवळ फाटा या डांबरी रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरणाने रुंदीकरण आणि भूमिगत सांडपाणी व मलशुध्दीकरण केंद्र तयार करण्याच्या कामांच्या प्रस्तावासही राज्य वन्य जीव मंडळाकडून मान्यता मिळाली आहे.या सर्व प्रस्तावांना राष्ट्रीय वन्य जीव मंडळाची मंजूरी मिळण्यासाठी वन विभागाने पाठपुरावा करावा, अशा सूचना वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी केल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात खारगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. के. राव यांच्या उपस्थितीत भीमाशंकर देवस्थान विकास आराखडा बाबतची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) रवी वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, तीर्थक्षेत्र विकास विभागाचे विशेष कार्यअधिकारी उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते. भीमाशंकर देवस्थानची विकास कामे वेळेत करण्यासाठी कालबध्द नियोजन करुन ही कामे दर्जेदार पध्दतीने पूर्ण करावीत, अशी सूचना खारगे यांनी दिल्या.तसेच भीमाशंकरच्या विकास आराखड्या अंतर्गत विविध कामांचा त्यांनी आढावा घेतला. त्याचप्रमाणे यात्रा काळात कायदा व सुव्यवस्थेसाठी नियुक्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर परिसरानजीक तात्पुरते वॉटरप्रुफ टेंट उभे करावेत.भीमाशंकर आराखड्यांतर्गत कामांना गती देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी संबंधित विभागांना दिल्या.डॉ. म्हैसेकर म्हणाले, बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणा-या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानला श्रावण महिन्यात व महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक भेट देतात. या ठिकाणी येणा-या भाविकांची व वाहनांची संख्या विचारात घेता अन्य सुविधांबरोबरच प्रशस्त वाहनतळ असणे गरजेचे आहे. खाजगी वाहनतळाच्या दृष्टीने नजीकच्या ठिकाणी उपलब्ध जागेची माहिती घेवून तहसीलदार, वनक्षेत्रपाल व गटविकास अधिकारी यांनी तीन आठवड्यात विभागीय आयुक्त कार्यालयात अहवालसादर करावा. पोलीस स्टेशन इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, स्वच्छतागृह आदी बांधकामांबाबत व सुविधांंबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माहिती दिली.
भीमाशंकर देवस्थानची कामे जलद गतीने करा : विकास खारगे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 7:08 PM
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणा-या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानला श्रावण महिन्यात व महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक भेट देतात.
ठळक मुद्देविभागीय आयुक्त कार्यालयात विकास कामांची आढावा बैठक विकास कामे वेळेत करण्यासाठी कालबध्द नियोजन करुन ही कामे दर्जेदार पध्दतीने पूर्ण करावी.