पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेण्यास मान्यता दिली असून, बुधवारी यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सर्व कुलगुरुंशी याबाबत चर्चा केली. त्यामुळे आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पदव्या घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने सुरू केलेल्या ‘डिग्री प्लस’ व्यासपीठाचा उपयोग होईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘डिग्री प्लस’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले आहेत. हजारो विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासक्रमाचा लाभ घेतला आहे. एकावेळी कोणतीही एकच पदवी पूर्ण करण्याचे बंधन असल्याने विद्यार्थी ऑनलाइन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करत होते. मात्र, थेट यूजीसीनेच एकाच वर्षी दोन पदव्या घेण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर म्हणाले, एकाचवेळी दोन पदव्यांचे शिक्षण प्रत्यक्ष वर्गात बसून घेणे शक्य आहे का? त्यासाठी कोणत्या सुविधा निर्माण कराव्या लागतील. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी एकाचवेळी एमबीएची पदवी घेऊ शकतो. मात्र, त्यासाठी एक अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकवावा लागेल. तसेच काही घटक शनिवारी किंवा रविवारी शिकवता येईल का? याबाबत चाचपणी करावी लागेल.
निर्णयाचे स्वागत करायला हवे
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. त्यात आता एकावेळी दोन पदव्या मिळवता येणार आहेत. औद्योगिक कंपन्यांनासुद्धा विविध विषयांचे ज्ञान असणारा व्यक्ती कर्मचारी म्हणून हवा आहे. त्यामुळे यूजीसीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. पुढील काही कालावधीत विद्यार्थ्यांना दोन पदवी अभ्यासक्रम कसे उपलब्ध करून दिले जातील, याबाबत विद्यापीठातर्फे निर्णय घेतला जाईल. यूजीसीने विद्यापीठांना यासाठी पूर्ण स्वायत्तता दिली आहे, असेही करमळकर यांनी स्पष्ट केले.