पुणे : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे मध्यंतरी पुण्यात येऊन गेले. त्यादिवशी त्यांनी रात्री साडेबारा वाजता शहरातील एका दवाखान्याला भेट दिली. त्यावेळी दवाखान्याबाहेर घोषणा सुरू होत्या. हा काय प्रकार आहे. कायदे करणारेच कायदे तोडू लागले तर परिस्थिती अवघड होईल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यावर टीका केली.
शपथ घेऊन ३५ दिवस होत आले. अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. रोज करतो करतो असे सांगतात, पण करत नाहीत. आता काय तर मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिले, मग मुख्यमंत्र्यांचे अधिकार मुख्य सचिवांना द्या असे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यक्रमांसाठी म्हणून पवार शनिवारी पुण्यात आले होते. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य केले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यावेळी उपस्थित होते.उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिंदे मंत्री होते, त्यावेळी वेळा पाळायचे, शिस्त पाळायचे. आता त्यांना काय झाले माहिती नाही. दवाखान्यात रात्री जात नाहीत, तिथे शांतता पाळायची असते असा नियम आहे, मात्र नियम करणारेच आता ते मोडूही लागले आहेत. लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांमधून मंत्री करायचे नाहीत तर ते अधिकार सचिवांना द्यायचे हे चुकीचे आहे. महाराष्ट्रात हे याआधी कधीही घडलेले नाही. याचा खुलासा करा अशी मागणी पवार यांनी केली.
दिल्लीवारी केल्याशिवाय त्यांना मंत्रिमंडळ जाहीर करता येत नाही अशी स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयात जी याचिका प्रलंबित आहे, त्यात मुख्य न्यायाधीशांनी काही मत व्यक्त केले आहे, त्याचा निकाल लागावा म्हणून ते थांबले आहेत अशी चर्चा असल्याचे पवार यांनी सांगितले. महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात, पण अशा गोष्टींची तड लावायला मंत्रिमंडळच अस्तित्वात नाही. पोलिसांना कार्यरत करायलाच कोणी नाही. शेतकरी आत्महत्या करतात, त्यांनाही कोणी वाली नाही. याकरिता यांनी सरकार बनवले का, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली का असा प्रश्न पवार यांनी केला.