पुणे: राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री ८ पासून संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामध्ये रिक्षा व्यवसायाला परवानगी दिली नाही. पण त्यांना पंधराशे रुपये आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. घर चालवण्यासाठी पंधराशे रुपये पुरतात का? असा सवाल रिक्षाचालकांनी मुख्यमंत्री यांच्याकडे उपस्थित केला आहे.
राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सार्वजनिक वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. ओला, उबेर या खासगी कंपन्यांनाही मुबा देण्यात आली आहे. पण रिक्षा चालकांना फक्त आर्थिक मदत देण्याचे सांगण्यात आले. त्या अनुषंगाने लोकमतने काही रिक्षा चालकांशी संवाद साधला.
सद्यस्थितीत कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या वर्षीपासून कोरोना थांबण्याचे नाव घेत नाहीये. तेव्हापासूनच आमच्या व्यवसायावर गदा आली आहे. असंख्य नागरिकही आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे तेही शक्यतो रिक्षाने प्रवास करणे टाळत आहेत. एका बाजूने महागाई वाढत आहे. तर दुसरीकडे हा आजार वाढत चालला आहे. आम्ही जगायचे कसे अशी व्यथा त्यांनी यावेळी मांडली आहे.
१५०० रुपयात कुटुंब चालत नाही. आम्हाला व्यवसायाला परवानगी द्या. महिन्याला ३, ४ हजार नुसता किराणा मालचा खर्च आहे. पूर्वी १५०० ला मिळणारा तेलाचा डबा आता ३६०० ला मिळत आहे. मग १५०० मध्ये कसं होणार. सरकारने याचा विचार करावा. रिक्षाचालकआम्हाला जागोजागी पोलीस पकडतात. रिक्षात दोनपेक्षा जास्त व्यक्ती दिसल्यास कारवाई केली जाते. त्यामुळे आम्ही नियमात राहून रिक्षा चालवत आहोत. आधी नागरिक रिक्षा चालकांना शोधत होते. आता मात्र आम्हीच पॅसेंजरच्या मागे फिरत आहोत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रिक्षाचालक
घरात कुटुंबाच्या खर्चासोबतच ज्येष्ठ व्यक्तींच्या औषधांचा खर्च असतो. आर्थिक मदतीपेक्षा व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. आम्ही सॅनिटायजर, मास्क सर्व काही नियम पाळून रिक्षा चालवू. आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. आता या परिस्थितीत कर्ज कसे फेडणार असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित झाला आहे. रिक्षाचालक